हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Education Loan) एज्युकेशन लोन अर्थात शैक्षणिक कर्ज हे विद्यार्थ्यांच्या महत्वाकांक्षा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी मदत करते. अनेक सामान्य कुटुंबातील मुले केवळ आर्थिक अडचणींमुळे शैक्षणिक सुविधांना मुकतात. देशात एकीकडे शिक्षण महाग होत चालले असताना मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे उभे करणे कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सोपी बाब राहिलेली नाही. अशावेळी पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची मदत घेतात. हे कर्ज मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सेतूचे काम करते.
शैक्षणिक कर्ज विद्यार्थ्यांना नवी स्वप्न पाहण्याची आणि उच्च शिक्षण घेऊन आपल्या करिअरची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रेरणा देते. मात्र शिक्षणासाठी कर्ज घेण्याआधी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. उच्च शिक्षणासाठी कर्ज घेतेवेळी सावधगिरी बाळगल्यास पुढे कर्जाची परतफेड करताना समस्या उदभवत नाहीत. यासाठी शैक्षणिक कर्ज घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.
कर्ज घेताना करा ‘या’ घटकांचा विचार (Education Loan)
विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमाची निवड करताना त्यावर होणाऱ्या खर्चाचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. यासाठीचे मुख्य घटक म्हणजे मुलांनी निवडलेला कोर्स देशांतर्गत आहे कि परदेशात याची माहिती घ्यावी. माहितीनुसार, देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी साधारणपणे १० लाख तर परदेशात शिक्षण घेण्यासाठी २० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे.
(Education Loan) दरम्यान, विद्यार्थ्यांनी निवडलेल्या कोर्सच्या पूर्ण कालावधीची फी, हॉस्टेल वा पीजी राहण्याचा खर्च, पुस्तके- वह्या व इतर आवश्यक वस्तूंचा खर्च, आवश्यकता असल्यास लॅपटॉप आणि इंटरनेटचा खर्च या महत्वपूर्ण घटकांचा विचार केल्यास हा सर्व खर्च कर्जाची रक्कम भागवू शकेल यानुसार कर्जासाठी अर्ज करावा. शिवाय IIM, IIT आणि ISB सारख्या मोठ्या संस्थां तेथील अभ्यासक्रमांसाठी अधिक कर्जे उपलब्ध करून देतात. याचीही माहिती घ्यावी.
कर्जफेडीचा कालावधी
ज्या दिवशी तुम्ही कर्ज काढता त्या दिवसापासून व्याज सुरु होते. दरम्यान ज्या अभ्यासक्रमासाठी कर्ज घेत आहात त्याच्या कालावधीशिवाय कर्जाची परतफेड करण्यासाठी १ वर्षाचा अतिरिक्त अधिस्थगन वेळ दिला जातो. ज्यात EMI भरावा लागत नाही. (Education Loan) तसेच जेव्हा तुम्ही EMI भरायला सुरुवात करता तेव्हा १५ वर्षांचा परतफेड कालावधीदेखील तुम्हाला मिळतो. हा अधिस्थगन कालावधी बँक आणखी २ वर्षे वाढवू शकते. त्यामुळे शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी अत्यंत विचारपूर्वक निवडावा.
कर्जावरील व्याजदर
शैक्षणिक कर्ज हे अभ्यासक्रम, संस्था, क्रेडिट स्कोर, अर्जदाराची सुरक्षा आणि मागील शैक्षणिक इतिहास या घटकांवर अवलंबून असते. आता कर्ज म्हटलं कि व्याजदर हा आलाच. मात्र विविध वित्तीय संस्थांच्या व्याजदरांत फरक असू शकतो. (Education Loan) त्यामुळे शैक्षणिक कर्ज घेण्यापूर्वी सर्व बँकांचे व्याजदर नीट समजून घ्यावे. तसेच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, अधिस्थगन कालावधी दरम्यान साध्या दराने आणि त्यानंतर चक्रवाढ व्याज दराने हे व्याज आकारले जाते हि बाब लक्षात घ्यावी.
कर्ज घेण्याआधी प्रवेश घेत असलेल्या इन्स्टिट्यूटच्या प्लेसमेंट इतिहास जाणून घ्या
शैक्षणिक कर्ज घेऊन कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्याचा प्लेसमेंट इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. यावरून तुम्हाला अभ्यासक्रमाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळेल कि नाही? पगार किती मिळेल? याचा साधारण अंदाज येईल. ज्यावरून तुम्ही उत्पन्नाच्या आधारावर EMI चा अंदाज लावू शकाल. त्यामुळे कर्ज घेण्याआधी इन्स्टिट्यूटचा प्लेसमेंट इतिहास आवर्जून पहा आणि मगच पुढे जाण्याचा विचार करा. (Education Loan)