खटाव | उज्वल भविष्य घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे असुन त्यामुळे विद्यार्थांनी व्यक्तीमत्व विकास व संभाषण कौशल्य आत्मसात केले पाहिजे असे मत श्रीनिवास पाटील फाऊंडेशन च्या उपाध्यक्षा रचना सारंग पाटील यांनी व्यक्त केले.
वडगाव ज.स्वा (ता.खटाव) येथे श्रीनिवास पाटील फाऊंडेशन व जयराम स्वामी विद्यामंदीर यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तीमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य कार्यशाळा संपन्न झाली,त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डाॅ. विकास घार्गे, प्राचार्य संजय पिसाळ, उपाध्यक्ष अंकुश घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रचना पाटील पुढे म्हणाल्या, शाळा, कॉलेज मध्ये विद्यार्थी भविष्याची स्वप्ने पाहत असतो. मात्र उज्वल भविष्य घडविण्यासाठी उत्तम संभाषण कौशल्य असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वताचे ध्येय निश्चित करुन ते साध्य करण्यासाठी स्वताला झोकून देवुन प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करुन ते साध्य करण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळवले पाहिजे, यश मिळालेच पाहिजे. यासाठी प्रयत्न केला पाहिजे, चिकित्सक व जागरूक बुद्धीचा व प्रभावी संभाषण कौशल्य असलेला विद्यार्थी हा कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होतो. विद्यार्थी घडविणे हाच या कार्यशाळेमागचा विचार आहे, असेही त्यांनी यावेळी नमुद केले.
यावेळी अध्यक्ष डाॅ. विकास घार्गे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास व्हा. चेअरमन अंकुश घार्गे, डॉ. गिता घार्गे, अविनाश काशीद, रामचंद्र बरकडे, काशिनाथ दुटाळ, अरुण जाधव, जे. बी. घार्गे, रमेश लहारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सचिन पवार यांनी केले. आभार पर्यवेक्षक बाळासाहेब घाडगे यांनी मानले.