कोरोना प्रतिबंधासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याबरोबरच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी.तसेच या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत कौन्सिल हॉल येथे डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विद्यापीठांचे कुलगुरु, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अध्यक्ष तथा भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षण विभागाचे सहसंचालक मोहन खताळ, उपायुक्त प्रताप जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवू नये, यासाठी प्रत्येकाने दक्षता बाळगणे गरजेचे आहे. चीन, इराण, इटली, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या ७ देशांचा प्रवास करुन आलेल्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन (विलगीकरण) करावे. या विद्यार्थ्यांनी स्वतः हून घरीच १५ दिवस स्वतंत्र रहावे, कुटुंबात अथवा समाजात मिसळू नये, अशा सूचना सर्वांपर्यंत पोहोचवा. परदेशातून आलेल्या व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार विलगीकरण कक्ष स्थापन करावा, मात्र या कक्षातील विद्यार्थ्यांचा इतर विद्यार्थ्यांशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. परदेशातून प्रवास करुन आलेल्या परंतु खासगी ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे प्रशासनाला सादर करावी, जेणेकरून त्यांची माहिती ठेवणे प्रशासनाला सोयीस्कर होईल. असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here