सातारा | आरबी समुद्रात निर्माण झालेल्य कमी दाबाच्या पट्यामुळे ताैक्ते चक्रीवादळ महाराष्ट्रात समुद्र किनार पट्टीवर घोगावत आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव सातारा जिल्ह्यातही गेले दोन दिवस पहायला मिळत आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यांतील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही भागातील घरांची पडझड झाल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. तसेच ठिकठिकांणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवार व सोमवारी जोरदार पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावलेली आहे.
रविवारी कराड शहरासह तालुक्याच्या विविध भागात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी अकरानंतर पावसास सुरवात झाली. दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस येत होता. पाटण तालुक्यात चक्रीवादळामुळे वेगाने वाहणारे वारे अन् कमी- अधिक प्रमाणात पडणारा पाऊस असे वातावरण येथे निर्माण झाले होते. पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने कामे ठप्प झाली होती. वादळी वारे जोरात वाहत होते. घरांचे व सार्वजनिक इमारतींचे कोणतेही नुकसान झालेले नाही, अशी माहिती तहसीलदार योगेश्वर टोपे यांनी दिली.
सोमवारी सकाळपासून पुन्हा वारे जोरात वाहू लागले. पहाटेपासूनच सातारा जिल्ह्यात रिमझिम पावसास सुरुवात झाली. रविवारी दिवसभर शहरात पावसांची रिपरिप सुरू होती. कोरेगांवसह दुष्काळी भागात ढगाळ वातावरण दिसून आले तर काही ठिकाणी पावासानेही रिपरिप केली.
पाचगणी आणि परिसरात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले असून, ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. बरीच झाडे ही वीज वितरणच्या तारा, पोल, ट्रान्स्फॉर्मरवर पडल्याने वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. पाचगणी मुख्य रस्त्यावर शॉपिंग सेंटरमधील सिल्व्हर मुख्य रस्त्यावर कोसळल्याने रस्त्याचे कडेला असणाऱ्या भारत पुरोहित यांच्या पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले. काहीठिकाणी विजेचे पोलही पडले आहेत. राजपुरी येथील विलास शंकर राजपुरे यांच्या घराचे छप्पर उडून गेले. दापवडी येथील सतीश वने यांच्या घरावरील उडून गेला. काटवली येथील सुमन राजणे यांच्या घरावरील पत्रा उडून गेला.
जिल्ह्यातील अनेक भागात विद्युत पुरवठा रात्रभर खंडित
कराड, पाटण, महाबळेश्वर, वाई आणि सातारा तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यामुळे पावसाची संततधार सुरू होती. या तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलेली होती. त्यामुळे विजपुरवठा खंडित करण्यात आला होता. रात्रभर लाईट नसल्याने लोकांना अंधारात रात्र काढावी लागली.