औरंगाबादेत एम्स, आयआयटीच्या उपकेंद्रासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – देशात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) ची संख्या सातवरुन २२ वर गेली आहे. एका राज्यात एकच ‘एम्स’ देण्यात येईल ही अट आहे. तरीदेखील महाराष्ट्र मोठे राज्य असल्यामुळे औरंगाबादेत ‘एम्स मिळावे. तसेच पवई आयआयटीचे उपकेंद्रही मिळावे यासाठी मी प्रयत्नशिल आहे. सोबतच जोपर्यंत मराठवाड्याचा विकास होणार नाही तोपर्यंत मी समाधानी नाही, असे प्रतिपादन नवनियुक्त केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले. व्यवसायाने डॉक्टर व एकेकाळी ‘आयएमए’चेच एक भाग असलेले आणि आता केंद्रीय मंत्री झाल्याबद्दल डॉ. भागवत कराड यांचा रविवारी‘आयएमए’ तर्फे सत्कार झाला. या सत्काराला उत्तर देताना डॉ. कराड बोलत होते.

कार्यक्रमाला डॉ. कराड यांच्या पत्नी डॉ. अंजली कराड, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, ‘आयएमए’चे राज्य उपाध्यक्ष डॉ. यशवंत गाडे, शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, उपाध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. संजय सावजी, डॉ. अंजली गाडे, डॉ. अपर्णा रंजलकर, डॉ. सचिन फडणीस, डॉ. दत्ता कदम, डॉ. मंजुषा शेरकर, डॉ. कराड यांचे वर्गमित्र डॉ. सुरेंद्र जैस्वाल, डॉ. मंगला बोरकर यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र सदनमधील सत्कार अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सत्कारापेक्षा ‘आयएमए’ने केलेला सत्कार माझ्यासाठी मोठा आहे. ‘आयएमए’मधूनच माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. माझ्या गावात सर्व डॉक्टर्स मित्र, वर्गमित्रांसमोर माझा सत्कार होत आहे हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा सत्कार आहे असे सांगताना डॉ. कराड भावुक झाले होते.

डॉ. भागवत कराड यांनी मांडलेले मुद्दे-
– शहरात पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट, हा प्रश्‍न सोडविण्यावर अधिक भर.
– २५ वर्षात जिल्ह्यात पर्यटनाबाबत नवीन एकही गोष्ट नाही. पर्यटन विद्यापीठासाठी प्रयत्न.
– साऊंड लाईट प्रकल्प दौलताबाद, घृष्णेश्‍वर, बिबी- का मकबरा येथे राबविणार.
– उस्‍मानाबाद, परभणीत वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्नशिल.
– मराठवाड्यातील मानव विकास निर्देशांक उंचावण्यावर देणार भर.
– संरक्षण क्षेत्रातील उद्योगासाठी प्रयत्नशिल.
– आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीने विकासासाठी प्रयत्न करणार.
– मराठवाड्यातील प्रलंबित सोडविण्यावर भर.
– ‘आयएमए’, डॉक्टरांचे प्रश्‍न प्राधान्यांने सोडविणार.

Leave a Comment