कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील कासारशिरंबे गावात कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत कासारशिंरबे गावात हाफसेंच्युरीकडे कोरोना बाधितांचा आकडा आला आहे. त्यामुळे कोरोना साखळी खंडित करण्याकरता कासारशिरंबेत रविवार दि. 25 एप्रिल ते शनिवार दि. 1 मे असा आठ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आली आहे.
या कालावधीत दवाखाने आणि मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. दूध डेअरी सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत व संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत चालू राहतील. तसेच किराणा दुकान, चिकन-मटण दुकान, भाजी विक्रेते, पतसंस्था, कृषी दुकाने, वि.का.स. सेवा सोसायटीचे व्यवहार पूर्णतः 8 दिवस बंद राहतील. कासारशिरंबेत सध्या 40 च्यावर कोरोनाचे सक्रीय रुग्ण असल्याने खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची ही तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाने घालून दिलेल्या अटी शर्थीचे पालन करावे.
कासारशिंरबे ग्रामपंचायतीच्या कर्मचारी पथकाला रस्त्यावर विनाकारण फिरताना सापडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून त्याची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. तसेच विना मास्क फिरणार्यांना 500 रूपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा