शेतक-याला गंडविणारे आठ जण सापडेना! फ्लॅटच्या नावाखाली उकळले २५ लाख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | डीएमआयसीकडे हस्तांतरीत झालेल्या जमिनीचा मोबदला मिळालेल्या शेतक-याला जाळ्यात ओढून आठ जणांनी फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून तब्बल २५ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार ८ जुलै रोजी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे फ्लॅटची इसारपावती एकाच्या नावे करुन दिशाभूल करत पैसे मात्र दुस-याच्या खात्यावर वळते करण्यासाठी भाग पाडले. दरम्यान, वर्षभर शेतक-याला मुंबईला हेलपाटे मारायला लावून आरटीआय चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गुंतवणुकीचे आमिष देखील दाखविण्यात आले होते. मात्र, शेतक-याने नकार दिल्यावर त्याच्याकडून उकळलेली रक्कम परत करण्यास टोळीने नकार दिल्यामुळे शेतकरी प्रचंड तणावात असून, नुकतेच शहरात येऊन गेलेल्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गा-हाणे मांडले आहे. तरीही केवळ वरिष्ठांची परवानगी नसल्याचे सांगत आरोपींना अद्यापही पुण्याहून आणण्यासाठी घोडे अडले आहे.

पैठण तालुक्यातील गणेश रावण ढोबळे (३३, रा. जांभळी) यांच्या वडिलांच्या नावे असलेली काही जमीन डीएमआयसी अंतर्गत हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यामोबदल्यात ढोबळे कुटुंबियांना २५ लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम गणेश ढोबळे यांच्या बँक खात्यात जमा होती. या पैशातून स्वत:चे घर घेण्याची त्यांची इच्छा होती. तर मित्र सचिन जाधव, अशोक शेजुळ, योगेश उभेदळ यांना ढोबळे घराच्या शोधात असल्याचे माहिती होते. त्यामुळे त्यांनी आदित्य रत्नाकर गारपगारे, त्याचा मामा मंगेश पारसनाथ भागवत, विपुल वक्कानी, संदीप भगत यांच्याशी ओळख करुन दिली. त्यानंतर कांचनवाडी, गट क्र. ४९ मधील अण्णासाहेब एकनाथ लोखंडे यांच्या अजिंक्यतारा बिल्डिंग, सैनिक विहार येथील थ्री बीएचके फ्लॅट ढोबळे यांना दाखविण्यात आला. तो फ्लॅट ढोबळे यांनी विकत घेण्याचे ठरवले.

त्यानुसार, लोखंडे याचा फ्लॅट मित्र, गारपगारे आणि त्याचा मामा भागवत यांच्या मध्यस्थीने घेण्याचे ठरले. यावेळी इसारपावती करुन देण्यासह दोन महिन्यांनी फ्लॅटची रजिस्ट्री करुन देतो असे सांगण्यात आले. पुढे ठरल्याप्रमाणे ढोबळे यांनी फ्लॅटची संपुर्ण रक्कम आरटीजीएसव्दारे गारपगारे याच्या खात्यात जमा केली. त्यानंतर १ नोव्हेंबर २०१९ रोजी जागा मालक अण्णासाहेब लोखंडे यांनी शंभर रुपयांच्या मुद्रांकावर फ्लॅटची इसारपावती करुन दिली. परंतू गारपगारे याने व्यवहाराची रक्कम लोखंडे यांना न देता स्वत:कडे ठेवून घेतली. दोन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतरही फ्लॅटची रजिस्ट्री करुन दिली नाही. त्यामुळे लोखंडे यांना याबाबत विचारणा केली होती. तेव्हा लोखंडे यांनी व्यवहाराचे पैसे मला मिळाले नाहीत. असे सांगत गारपगारे याच्याकडून पैसे मिळवून देण्याची हमी दिली. मात्र, लोखंडे यांनी पैसे परत मिळवून न देता वारंवार उडवा-उडवीची उत्तरे दिली. पुढे गारपगारे व त्याचा मामा भागवत यांनी सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्यांनी ढोबळे यांच्याकडून शैक्षणिक कागदपत्रे देखील हस्तगत केली. तसेच एका को-या मुद्रांकावर ढोबळे यांची स्वाक्षरी घेतली होती.

Leave a Comment