पुणे,दि. १२ वार्ताहर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी व सांस्कृतिक विकासासाठी दशकभरापासून कार्यरत असणाऱ्या एकलव्य सामाजिक विज्ञान बहुउददेशीय संस्थेकडून यंदा पुण्यात पुस्तक संकलनासाठी अभिनव कल्पना राबवण्यात येत आहे. उपक्रमाचे चौथे वर्ष असणारी ही मोहीम कोरोनामुळे ठप्प होती, मात्र आता सर्व निकषांचे पालन करून शहरात मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त अप्पा बळवंत चौक येथील रयत प्रबोधिनी येथील संकलन केंद्रावर तसेच फिरत्या वाहनाद्वारे जुनी पुस्तके, फर्निचर, कम्प्युटर तसेच कपाटे यांचे संकलन केले जाईल. यासाठी 9561303168 आणि 7755999443 या क्रमांकावर संपर्क साधावा.
गाव तेथे ग्रंथालय’ या मोहिमेच्या अंतर्गत गावागावात वाचनालये उभे करून पुढे ती गावाची शाश्वत विकास केंद्रे व्हावीत, या उद्देशाने चालवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे. विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या ह्या चळवळीमार्फत विविध शहरांतून आजवर घेण्यात आलेल्या पुस्तक संकलन मोहिमांमधून ३० हजाराहून जास्त पुस्तके विदर्भ, मराठवाडा, कोकण विभागातील ३० हुन अधिक ग्रंथालयांत पोचवली गेली आहेत.. ग्रामीण भागात ज्ञान संसाधने पुरवून ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दर भरून काढण्याच्या ध्येयाने हा उपक्रम राबवण्यात येतो. मागील तीन वर्षांपासून पुणेकरांनी ह्या उपक्रमास भरभरून मदत केली आहे.
कोरोना आपत्तीदरम्यान एकलव्यकडून महाराष्ट्रभरातील बारा हजार मजूर, स्थलांतरित कामगार, शेतकरी व वंचित घटकांपर्यंत लोकांपर्यंत राशन तसेच इतर अत्यावश्यक गोष्टी पुरवल्या होत्या.
‘शिक्षणाद्वारे परिवर्तन’ या उद्देशाने एकलव्यने विविध कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यापैकी एकलव्य अकॅडमी हा कार्यक्रम ग्रामीण, आदिवासी व वंचित घटकांत शैक्षणिक व विकास क्षेत्रातील नेतृत्व विकसित करण्यासाठी सुरू असून या माध्यमातून आतापर्यंत 100 पेक्षा जास्त पहिल्या पिढीतील विद्यार्थी युवक हे राष्ट्रीय पातळीवरील नामांकित विद्यापीठांत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. राज्य सरकारच्या ट्रान्सफॉरमिंग महाराष्ट्र स्पर्धेत टीम एकलव्यला ह्या कल्पनेसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पीपल्स चॉईस पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
‘संकलानातून मिळणाऱ्या मदतीतून हे उपक्रम विस्तारण्याचा व जनतेकडून लोकचळवळीसाठी पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रभर नेण्याचा संस्थेचा मानस आहे असे संस्थेचे अध्यक्ष राजू केंद्रे यांनी याप्रसंगी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’