पुणे । ‘सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, असे सूचक विधान शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. एकनाथ खडसे यांचे पक्षांतर निश्चित आहे, असं गुलाबराव पाटील यांनी नुकतचं म्हटलं आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत गुलाबराव पाटील यांच्या विधानावर विश्वास नसल्याचे सांगितलं आहे.
भाजपाच्यावतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले, यावेळी चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ”नाथाभाऊंनी वारंवार सांगितले आहे की ज्या पक्षात मी वाढलो, मोठा झालो त्या पक्षाचे नुकसान मी करणार नाही. मात्र, तरीही तुमचा गुलाबरावांवर विश्वास आहे, आमच्या नाथाभाऊंवर नाही.”
गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबत व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनंतर खडसे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत जाणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण मुंबईत खडसेंची राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवारांसोबत भेट होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, मुंबईत ४ दिवस थांबून असताना खडसे आणि शरद पवार यांच्यात कोणत्याही प्रकारची भेट झाली नाही.
मध्यंतरी खडसेंनी शिवसेनेत यावे, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांकडून घातला जात होता. त्यात मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत यांच्यासह स्वतः गुलाबराव पाटील यांनी खडसेंना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. मात्र, खडसेंनी याबाबत कोणतेही मत मांडले नव्हते. त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या जळगावातील नेत्यांना मुंबईत बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चाचपणी केली होती. तेव्हापासून खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”