एकनाथ खडसे भाजपला रामराम करणार हे निश्चित; ‘या’ मंत्र्याने दिले स्पष्ट संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत जाणार अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने अगदी सूचक प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ‘सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, असे सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केले. गुलाबराव पाटील अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना ते बोलत होते.

गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबत व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनंतर खडसे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत जाणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण मुंबईत खडसेंची राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवारांसोबत भेट होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, मुंबईत ४ दिवस थांबून असताना खडसे आणि शरद पवार यांच्यात कोणत्याही प्रकारची भेट झाली नाही. मध्यंतरी खडसेंनी शिवसेनेत यावे, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांकडून घातला जात होता. त्यात मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत यांच्यासह स्वतः गुलाबराव पाटील यांनी खडसेंना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. मात्र, खडसेंनी याबाबत कोणतेही मत मांडले नव्हते. त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या जळगावातील नेत्यांना मुंबईत बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चाचपणी केली होती. तेव्हापासून खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे.

मात्र, मुंबई दौरा केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत. या साऱ्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगवून खडसे मागच्या दाराने शिवसेनेत तर जाणार नाहीत ना? अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज गुलाबराव पाटील यांनी दिलेली सूचक प्रतिक्रिया खडसेंच्या शिवसेना प्रवेशाकडे अंगुलीनिर्देश करत आहे. दरम्यान, मुंबईत असताना एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत कोणत्याही हालचाली न होणे, त्यानंतर खडसे मुंबईतून जळगावात परतल्यानंतर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी ‘खडसे पक्षांतर करतील हे सत्य आहे’, असे वक्तव्य करणे या गोष्टींमुळे आता खडसे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगत आहे. या साऱ्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खडसेंच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment