कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय सेवेतील योगदान अभूतपूर्व आहे. कोविड काळात कृष्णा हॉस्पिटलने दिलेली वैद्यकीय सेवा विशेष उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवेचे कौतुक केले. कराडच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी कृष्णा हॉस्पिटलला सदिच्छा भेट देऊन, कॅम्पसची पाहणी केली.
भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना. शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विशेष उपस्थित असलेले पालकमंत्री शंभुराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख या मान्यवरांचेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी कॅम्पसची पाहणी केली.
यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेबद्दल माहिती देत, कोरोना काळात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. याचबरोबर कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याची माहितीही मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच कराड दक्षिणमधील विविध विकासकामांबाबत चर्चा केली.
यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, वसंतराव शिंदे, सयाजी यादव, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, जि. प. सदस्य सागर शिवदास, मुकुंद चरेगावकर, कृष्णा विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, उमेश शिंदे यांच्यासह हॉस्पिटलचे डॉक्टर्स, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.