हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली. गणपती दर्शनासाठी दोन्ही नेते राज ठाकरेंच्या घरी गेले होते. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा राज ठाकरेंच्या घरी पोहचले आहेत. राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचे दर्शन एकनाथ शिंदेनी घेतले.
खरं तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतरही एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये जवळीक निर्माण झाली होती. राज ठाकरे अनेकदा शिंदे मुख्यमंत्री असताना वर्षावर जायचे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेही गणपती दर्शन असो वा इतर कारणासाठी राज ठाकरेंच्या घरी जायचे. मात्र मागच्या काही दिवसापासून राजकारण पूर्णपणे बदललं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये युती होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केल्याने थेट शिंदेच्या शिवसेनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर आज प्रथमच एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले. आजच्या भेटीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा सुरु आहे.
राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका. जसे मागच्या वर्षी मी राज ठाकरेंच्या गणपती दर्शनाला आलो होतो तसच आताही आलो आहे. आम्ही तर नेहमीच राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शनाला येतो, परंतु यावर्षी आपण काही नवीन लोक येथे आलेले सुद्धा बघितलं, त्याचा आनंद झाला अशी कोपरखळीही नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंना मारली. मी गणरायाला एवढंच साकडं घातलं कि महाराष्ट्रावरची विघ्न दूर कर, बळीराजाला सुखी ठेव, चांगला पाऊस पाड, बळीराजाची प्रगती, उन्नती होउदे…. आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, जेष्ठ नागरिक आहेत ,, अशा महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना सुखात समाधानात ठेव असं साकडं आपण बाप्पाला घातल्याची माहिती एकनाथ शिंदेनी दिली.




