हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शिंदे गटात (Shinde Group) बंडाची चाहूल आहे. एकनाथ शिंदे यांचे ६ आमदार हे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) संपर्कात असून लवकरच ते ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले असून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात फार मोठ्या उलथापालथी होणार असल्याचं चित्र आहे. हे ६ आमदार नेमके कोण आहेत ते मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. उद्धव ठाकरेंना लोकांची प्रचंड सहानभूती मिळाल्याचे पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंचे ९ खासदार निवडून आले तर महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून आले. तर दुसरीकडे शिंदे गटाचे ७ खासदार जिंकले, मात्र निवडणुकीत महायुतीची पूरती वाताहत झाली. अवघ्या १७ जागाच महायुती जिंकता आल्याने युतीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुढील धोका ओळखून शिंदे गटातील ६ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील असं बोललं जात आहे.
कोणाकोणाला पक्षात घेणार ?
शिंदे गटात जाऊनही ज्या आमदारांनी आत्तापर्यंत तटस्थ भूमिका घेतली, ठाकरेंवर टीका केली नाही अशा आमदारांना उद्धव ठाकरे पुन्हा पक्षात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या सहा आमदारांना प्रवेश दिल्यास इतर आमदारही ठाकरे गटात येऊ शकतात. असं झाल्यास विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरेल.
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी या घडामोडींवर भाष्य करताना म्हंटल कि, अनेक लोक दिवाळीपासून आमच्याशी संपर्क करत आहेत. कारण ज्या लोकांना वाटलं की, आता आमचंच सरकार राहणार आहे, आता आम्हीच निवडून येणार आहोत. परंतु त्यांच्याशी किती संपर्क ठेवायचा? नाही ठेवायचा हा नंतरचा भाग आहे. आमच्यासाठी तो विषय संपला आहे. आम्ही आमच्याच लोकांना घेऊन विधानसभा लढणार आहोत, असं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं.