खर्चात तफावत असल्यानं या उमेदवारांना आयोगाच्या नोटिसा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख

नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार समीर भुजबळ, हेमंत गोडसे, आणि माणिकराव कोकाटे यांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चात निवडणूक विभागाला तफावत आढळून आली आहे. निवडणूक शाखेने शनिवारी (दि. १९) याबाबतच्या नोटिसा बजावल्या असून त्याचे उत्तर देण्यासाठी त्यांना ७२ तासांचा कालावधी दिला आहे.

नाशिकमध्ये २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदानापूर्वी उमेदवारांना तीन वेळा खर्चाचा तपशील सादर करणे अनिवार्य आहे. त्यानुसार, उमेदवारांनी शुक्रवारी (दि.१९) पहिल्या टप्प्यातील खर्च जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडे सादर केला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी २० लाख ७३ हजार ७२० रुपये खर्च केल्याचे अहवालात म्हटले आहे. कोकाटे यांनी १३ लाख २४ हजार ९५६ रुपये खर्च दाखविला तर शिवसेना-भाजपचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी ११ लाख ४८ हजार ९३७ रुपयांचा खर्च सादर केला आहे. या खर्चाच्या रकमांचा प्रशासनाने त्यांच्याकडील खर्चाच्या आकडेवारीशी ताळमेळ घातला असता त्यामध्ये मोठी तफावत आढळली आहे.

तिनही उमेदवारांनी प्रत्यक्षात झालेल्या खर्चापेक्षा कमी रक्कम दाखविल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे. त्यामुळे निवडणूक शाखेने शनिवारी या उमेदवारांना नोटीस बजावल्या. पुढील तीन दिवसांमध्ये उमेदवारांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे त्यामध्ये नमूद केले आहे. उमेदवार काय स्पष्टीकरण देतात त्यानुसार निवडणूक शाखा पुढील निर्णय घेईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गुन्हेगारी माहिती प्रसिद्धीबाबत स्मरणपत्र गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांनी त्याबाबतची माहिती वर्तमान पत्रांमधून तीन वेळा प्रसिद्ध करावी असे निर्देश यंदा प्रथमच निवडणूक आयोगाने दिले आहेत.

तसेच ही माहिती प्रसिद्ध केल्यानंतर तसे जिल्हा प्रशासनाला कळविणेही अपेक्षित आहे. परंतु, अद्याप काही उमेदवारांनी ही माहिती प्रसिद्ध केलेली नाही तसेच काहींनी त्याबाबत कळविले नसल्याचे निरीक्षक जिल्हा प्रशासनाने नोंदविले आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार हेमंत गोडसे, समीर भुजबळ, माणिकराव कोकाटे, पवन पवार आणि सुधीर देशमुख यांना स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. आपण जाहिराती प्रसिद्ध केल्याचे भुजबळ यांचे म्हणणे आहे. तर जाहिराती प्रसिद्धीबाबत भुजबळ यांनी अद्याप निवडणूक शाखेला कळविले नसल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली आहे.

Leave a Comment