इलेक्ट्रिक वाहन मालकांवरील ताण कमी, 7000 पेट्रोल पंपांवर BPCL उघडणार चार्जिंग स्टेशन

नवी दिल्ली । फॉर्च्युन ग्लोबल 500 कंपन्यांपैकी एक आणि भारत सरकारच्या मालकीची महारत्न कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने पुढील पाच वर्षांत सुमारे 7,000 पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी म्हणजेच EV (Electric Vehicles) साठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली आहे.

अलीकडेच, देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी असलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन म्हणजेच IOC ने सांगितले होते की,”कंपनी पुढील तीन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांसाठी म्हणजेच EV साठी 10,000 चार्जिंग स्टेशन्स स्थापन करेल.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी COP-26 दरम्यान भारतासाठी 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट जाहीर केले. भारत सध्या जगातील तिसरा सर्वात मोठा कार्बन उत्सर्जन करणारा देश आहे.

BPCL चे देशभरात सुमारे 19,000 रिटेल आउटलेट आहेत
देशातील दुसरी सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी BPCL चे मार्केटिंग नेटवर्क आहे, ज्यामध्ये देशभरातील सुमारे 19,000 रिटेल आउटलेटचा समावेश आहे. “EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नवीन व्यवसाय संधी देईल तसेच ऑटो इंधनाची आवश्यकता कमी झाल्यास उद्भवणाऱ्या जोखमीपासून बचाव करेल,” असे कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे.

कंपनीने म्हटले आहे की, “नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत आणि लोकंही त्यात रस घेत आहेत. अशा परिस्थितीत, येत्या काही वर्षांत, देशातील इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टममध्ये वेगाने वाढ होण्याची अपेक्षा आहे.”