हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रोजगार-लिंक्ड प्रोत्साहन निधी म्हणजेच (ELI) योजनेचा लाभ घेण्यासाठी युनिक अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करणे आणि बँक खाते आधारशी लिंक करणे केंद्र सरकारने यापूर्वीच अनिवार्य केले आहे. आता ही प्रक्रिया करण्यासाठी सरकारने 15 मार्च 2025 पर्यंत मुदत वाढवली आहे. यापूर्वी 15 फेब्रुवारी 2025 ही अंतिम तारीख होती, मात्र अनेक कर्मचाऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे ही मुदत आणखी एका महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे.
ELI योजना ही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे पहिल्यांदा नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. हा निधी रोजगार वाढवण्याच्या दृष्टीने सरकारकडून देण्यात येतो. याशिवाय, उत्पादन क्षेत्रात रोजगार वाढवण्यासाठी आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांना संधी देणाऱ्या नियोक्त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
UAN क्रमांक सक्रिय करणे का गरजेचे?
युनिक अकाउंट नंबर (UAN) हा एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) कडून प्रत्येक खातेदाराला दिला जातो. हा 12 अंकी क्रमांक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्याशी जोडलेला असतो. एखादा कर्मचारी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत असला तरी त्याच्या पीएफ खात्याचा डेटा यूएएनद्वारे एका ठिकाणी व्यवस्थापित करता येतो. त्यामुळे कोणत्याही शंका टाळण्यासाठी UAN क्रमांक सक्रिय असणे गरजेचे आहे.
यूएएन सक्रिय करण्यासाठी काय करावे?
- प्रथम ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- “Active UAN” पर्याय निवडा.
- पुढे यूएएन क्रमांक, पीएफ खाते क्रमांक आणि जन्मतारीख याची माहिती भरा.
- शेवटी OTP द्वारे सर्व प्रक्रिया पूर्ण करा.
आधार आणि बँक खाते लिंक करण्याचे टप्पे
- ईपीएफओ पोर्टलवर खाते लॉगिन करा.
- केवायसी विभागात आधार व बँक खाते माहिती अपडेट करा.
- आधार क्रमांक जोडण्यासाठी ओटीपी प्रमाणीकरण करा.
- सर्व माहिती तपासून अपडेट सबमिट करा.
दरम्यान, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 21 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या परिपत्रकात ही मुदतवाढ जाहीर केली आहे. ही योजना रोजगारनिर्मितीस चालना देण्यासाठी तयार करण्यात आली असून, नव्या कर्मचाऱ्यांसाठी ही आर्थिक मदत मोठ्या संधीसारखी आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी 15 मार्चपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.