परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल मुंबईतील एक ऐतिहासिक आणि वाहतुकीसाठी महत्त्वाचा पूल आज रात्री 9 वाजल्यापासून कायमस्वरूपी बंद करण्यात येत आहे. 125 वर्षे जुना असलेला हा पूल, आता वरळी-शिवडी एलिव्हेटेड कोरिडॉरच्या कामासाठी पाडण्यात येणार आहे. त्याच्या जागी डबल डेकर पूल उभारण्याचं काम MMRDA करणार आहे.
नागरिकांचा विरोध, हरकती आणि वाहतूक बदल
या पूल बंद करण्यात येणार असल्याच्या बातमीनंतर नागरिक आणि वाहनचालकांनी तीव्र विरोध व्यक्त केला होता. परिणामी महापालिकेने नागरिकांकडून हरकती मागवून त्यांच्या सूचनांनुसार वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
पर्यायी मार्ग कोणते?
- दादर (पूर्व) ते दादर मार्केट (पश्चिम):
→ टिळक पुलाचा वापर करता येईल. - परळ (पूर्व) ते प्रभादेवी / लोअर परळ:
→ करी रोड पूल वापरणे शक्य आहे. - परळ, भायखळा (पूर्व) ते प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सी-लिंक दिशेने:
→ चिंचपोकळी पूल हे मुख्य पर्याय. - प्रभादेवी/लोअर परळ (पश्चिम) ते टाटा हॉस्पिटल, KEM हॉस्पिटल (परळ):
→ करी रोड पूल फक्त दुपारी 3 ते रात्री 11 या वेळेत वापरण्यास अनुमती. नागरिकांनी वाहतूक नियोजन काळजीपूर्वक करावं
पूल बंद झाल्यानंतर या मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिका व वाहतूक पोलीसांनी नागरिकांना वाहन चालवताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.