मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि इतर मंत्रीदेखील ‘वर्षा’ बंगल्यावर उपस्थित होते. तर इतर मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला हजर होते. या बैठकीनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या बैठकीत मुख्यमंत्री काय बोलले हे त्यांनी सांगितले.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला. या बैठकीला पालकमंत्रीदेखील उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी काय उपाययोजना करात येतील, याबाबत चर्चा झाली”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या बैठकीत कोरोनासोबतच इतर विकासाच्या प्रकल्पांबाबतही चर्चा झाली, असंदेखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी अचानक ही तातडीची बैठक बोलावल्यामुळे नेमकी काय चर्चा झाली यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
दरम्यान, या बैठकीत पारनेरबाबत काही चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला असता, “पारनेरचे पाचही नगरसेवक पुन्हा शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे तो विषय संपला आहे. आघाडीत अशा कुठल्याही घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”