सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुसेगाव येथील सुपुत्र एन्काऊंटर स्पेशालिस्ट राम जाधव यांचा सोमवारी मुंबईत राज्यपालांच्या हस्ते उल्लेखनीय केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतीच्या पोलीस पदकाने सन्मान करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट राम जाधव यांना पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल सोमवार दिनांक 21 राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईतील राजभवनात होणाऱ्या शानदार समारंभात श्री. जाधव यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे. पोलीस दलातील अतुलनीय कामगिरीबद्दल जाधव यांचा यापूर्वी 2001 मध्ये राष्ट्रपती शौर्यपदक देऊन सन्मान करण्यात आला. 2002 मध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकाकडून विशेष प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करून गौरविण्यात आले. 2009 मध्ये पोलिस दलातील गुणवत्तापूर्वक कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतीचे गौरव पदक त्यांना प्रदान करण्यात आले. तसेच 2019 मध्ये त्यांना राष्ट्रपतीचे विशिष्ट पोलीस पदक जाहीर करण्यात आले.
कोरोनाच्या साथीमुळे गेली दोन वर्षे पदक वितरणाचे कार्यक्रम स्थगित ठेवण्यात आले होते. ते पदक त्यांना सोमवारी (दि.21) समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. पोलीस सेवेत तीनवेळा राष्ट्रपती पदक मिळवणारे राम जाधव हे राज्यातील एकमेव अधिकारी ठरले आहेत. राज्याचे माजी पोलीस महासंचालक कै. धनंजयराव जाधव तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राम जाधव यांनी एमपीएससी द्वारे पोलीस दलात प्रवेश केला. त्या पाठोपाठ त्यांचे बंधू भरत आणि पुतणे किशोर जाधव यांनीही या परीक्षेत यश मिळवले.
पुसेगावच्या धनंजय जाधव यांचा आदर्श जपल्याने राम, किशोर आणि भरत त्या जाधव कुटुंबातील तीन शिलेदार बाबत सबंध जिल्ह्यात कौतुक आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहाय्यक आयुक्त या पदावरून गतवर्षी निवृत्त झालेल्या राम जाधव यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण, दहशतवाद प्रतिबंधक पथक येथे चमकदार कामगिरी बजावली आहे.