‘ईडी’चा कारनामा! १५ वर्षांत फक्त १४ प्रकरणांतच आरोप करू शकली सिद्ध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । चौकशीचे शुक्लकाष्ठ ‘ईडी’ अर्थात सक्तवसुली संचालनालय. ‘ईडी’चा दरारा एवढा मोठा की, चौकशीसाठी बोलावणे आले की, समोरच्याच्या उरात धडकी भरते. अनेकांना घाम फुटतो. अलीकडच्या काळात विरोधांना छळण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या हातातली ईडी’ म्हणजे ब्रम्हास्त्र असं म्हटलं जातं आहे. असे असले तरी गेल्या १५ वर्षांत ‘ईडी’ ला फक्त १४ प्रकरणांतच आरोप सिद्ध करून दाखविण्यात यश आले असल्याची माहिती समोर आली आहे. ‘लोकमत’ वृत्तपत्राने याबाबतची आकडेवारी समोर आणली आहे.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (पीएमएलए) २००५ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर ‘ईडी’ला अमर्याद अधिकार प्राप्त झाले. त्यानंतर ‘ईडी’च्या छाप्यांमध्ये वाढ झाली. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा, माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम, भूपिंदरसिंह हुड्डा, अगुस्टावेस्टलँड, डी. के. शिवकुमार, व्हिडीओकॉन, आयसीआयसीआय, विजय मल्या, आयएनएक्स मीडिया, फारूक अब्दुल्ला, मेहुल चोक्सी इत्यादींना ‘ईडी’च्या चौकशीचा अनुभव आला आहे. अलीकडेच सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीमुळेही ‘ईडी’ चर्चेत होती. मात्र, असे असले तरी गेल्या १८ वर्षांतील आकडेवारी पाहता चौकशांच्या तुलनेत प्रकरण निकाली लावण्याच्या बाबतीत ‘ईडी’ कैक योजने दूर असल्याचे निष्पन्न होते.

मोदी सरकारच्या कारकीर्दीत छाप्यांमध्ये वाढ
काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या तुलनेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कारकीर्दीत ‘ईडी’च्या छाप्यांमध्ये उल्लेखनीय प्रमाणात वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ‘ईडी’ने ९९ छापे टाकले होते. त्याचेच प्रमाण २०१९ मध्ये ६७० एवढे होते. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या गेल्या सहा वर्षांच्या काळात ‘ईडी’ केवळ नऊ प्रकरणांतच दोषारोप सिद्ध करू शकली आहे.

अपुरा कर्मचारीवर्ग कारणीभूत
दोषारोप सिद्ध करण्याच्या कामात ‘ईडी’ला येत असलेल्या अपयशाचे एक कारण म्हणजे अपुरे मनुष्यबळ होय. ‘ईडी’मध्ये २००० लोकांची भरती करण्यासाठी मंजुरी मिळाली होती. प्रत्यक्षात सद्य:स्थितीत केवळ ११०० कर्मचारीच ‘ईडी’मध्ये आहेत. त्यामुळे या अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम तपासावर होतो. दरम्यान, ‘ईडी’च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्तम प्रशिक्षणाची गरज असल्याचे मत ‘ईडी’चे माजी संचालक कर्नाल सिंग यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment