Saturday, June 3, 2023

नोकरदारांसाठी खुशखबर ! पीएफचे व्याजदर वाढणार

अर्थकारण |नोकरदार वर्गासाठी उत्तम बातमी आली असून कर्मचारी भविष्य निधी अर्थात EPF चा व्याजदर वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अर्थमंत्रालयाच्या वतीने  ईपीएफचे व्याजदर 8.65 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा देशातील  6 कोटी नोकरदारांना मिळणार आहे.

अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वित्तीय सेवा विभागाने (DFS)2018-19 साठी EPFO  ने आपल्या सदस्यांना 8.65 एवढे  व्याज मिळावे या  निर्णयाला संमती दिली. काही अटींचे  पालन करण्याच्या तरतुदीवर ईपीएफओने या व्याजदर वाढीच्या प्रस्तावाला संमती दिली.यापूर्वी कामगार मंत्रालयाने ईपीएफचे व्याज दर वाढवून 8.65 करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आता मंजुरी मिळाली.

2017-18 या आर्थिक वर्षात भविष्य निर्वाह निधी अर्थात PF वरचा व्याजदर 8.55 होता. गेल्या तीन वर्षांत पीएफच्या  व्याजदर सातत्याने घट होत आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात  8.8 एवढा असलेला व्याजदर 2016-17 या आर्थिक वर्षात  कमी करून 8.65 करण्यात आला होता. आता पुन्हा त्या आकड्यावर व्याजदर घेवून जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ईपीएफओच्या अंदाजानुसार, व्याजदर वाढवल्याने 151.67 कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याने  हा व्याजदर अतिरिक्त बोजा 158 कोटींवर जाणार आहे.