औरंगाबाद | हिंस्त्र प्राण्यांना पकडण्यासाठी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली आहे. वाघ बिबट्या सारख्या हिंस्र वन्यप्राण्यांना सुरक्षितपणे पकडण्यासाठी औरंगाबाद येथील वनविभागाच्या शीघ्र कृती दलाने ही कामगिरी केली आहे. यामध्ये 16 जणांचा समावेश असून औरंगाबाद सोबतच सोलापूर, नगर, बीड या ठिकाणी उत्तम कामगिरी करण्यात आली आहे.
औरंगाबादसह सोलापूर, पाथर्डी, अहमदनगर याठिकाणी बिबट्या, माकड व त्यांची पिल्ले पकडण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास 100 वन्यप्राणी सुरक्षित पकडण्यात आले आहेत. काही दिवसापूर्वी देवळाई डोंगरात बिबट्याने अनेक जनावरांचा फडशा पाडला होता. त्याचबरोबर पैठण येथे बाप लेकीवर बिबट्याने हल्ला केला होता. अशावेळी आपतकालीन प्रसंगी नाशिक किंवा नागपूर येथून वनविभागाला हे पथक मागवावे लागत होते. त्यामुळे वन्यप्राण्यांना जेरबंद करण्यासाठी औरंगाबादेत रॅपिड रिस्पॉन्स युनिट असावे, अशी अपेक्षा वनविभागाची होती. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी 2018 मध्ये विशेष निधी मंजूर करून दिला. त्यानुसार सहायक वनसंरक्षक प्रशांत वरुडे यांच्या अधिपत्याखाली हे शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले.
सध्या सहायक वन संरक्षक सचिन शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी आनंद गायके, वनपाल मनोज कांबळे, वन्यजीव अभ्यासक आदी गुडे यांच्यासह 16 जणांची टीम आहे. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. शीला जाधव यांचाही यामध्ये समावेश आहे. या प्राण्यांना पकडण्यासाठी अत्याधुनिक गनचा वापर केला जातो. बिबट्या, वानर, वन्यजीवांना पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्याकडे जुनाट यंत्रणा होती. परंतु आता या पथकामध्ये अत्याधुनिक गणचा वापर करण्यात आहे, या वन्यप्राण्यांना सुरक्षित पकडून त्याच्या अधिवासात सोडण्यात येते.