हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| वॉशिंग्टन डीसीजवळील रीगन नॅशनल एअरपोर्टच्या (Reagan National Airport) जवळ अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइट 5342 आणि अमेरिकी लष्कराच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरमध्ये (Black Hawk Helicopter) भीषण धडक झाली आहे. या अपघातात दोन्ही वाहने पोटोमॅक नदीत कोसळली आहेत. मिळालेल्या, माहितीनुसार, या दुर्घटनेत तब्बल 19 जणांचा मृत्यु झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या, बचावकार्य सुरू आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकन एअरलाइन्सचे फ्लाइट 5342, जे कॅन्सासमधील विचिटा येथून वॉशिंग्टन डीसीच्या रीगन नॅशनल एअरपोर्टकडे येत होते. यामध्ये 60 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. विमान लँडिंगच्या तयारीत असतानाच त्याची हवेतच ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरशी धडक झाली आणि हा अपघात घडला. या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर विमानाचे मोठे नुकसान झाले आणि ते अंदाजे सात फूट खोल पाण्यात कोसळले. तर हेलिकॉप्टर देखील उलटे होऊन नदीत पडले. सध्या बचावकार्यांसाठी 300 हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर, आतापर्यंत 19 मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. या अपघातात चार जणांना जिवंत वाचवण्यात यश आले आहे.
दरम्यान, या अपघातात अमेरिकन फिगर स्केटिंग संघाचे सदस्य, प्रशिक्षक आणि दोन रशियन चॅम्पियन स्केटर्स प्रवास करत होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. महत्वाचे म्हणजे, अपघाताची माहिती मिळताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. या सर्व घटनेनंतर रीगन नॅशनल एअरपोर्टवरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.