जरी भरला नाथसागर, तरी आमची रिकामी घागर; सोशल मीडियावर औरंगाबादकर संतापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेले जायकवाडी धरण पूर्णपणे भरल्याच्या वृत्ताने काल मराठवाड्यात आनंदी आनंद होता. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याआधी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याहस्ते जलपूजनदेखील करण्यात आले. मात्र धरणातील पाण्याचा संचय करणारा नाथसागर भरला तरीही शहरातील नळांना सहा दिवसांनीच पाणी येते, या भावनेने औरंगाबादकरांनी समाज माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

जायकवाडी धरणातून बुधवारी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर शहारतील पाणीपुरवठ्याच्या अवस्थेविषयी सामाजिक माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग होण्याचे छायाचित्र शेअर करीत महिला व तरुण मंडळींनी पाणीपुरवठ्यावरचा राग व्यक्त केला. ‘तू कितीपण भरला तरी औरंगाबादला 6 दिवसांनीच पाणी येणार’ अशी प्रतिक्रिया देत मनपाच्या कारभारावर टीका करण्यात आली. जायकवाडी धरण भरले तरी औरंगाबादला 6 दिवसांनीच पाणी येणार असेल तर आम्हाला त्याचा फार आनंद नाही. शहरातील नळांना दररोज किंवा एका दिवसाआड पाणी मिळत नाही, हे पाणीपुरवठा विभागाचे अपयश आणि औरंगाबादकर म्हणून आमचे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया एका नागरिकानी व्यक्त केली.

नाथसागर भरल्याची चर्चा बुधवारी दिवसभर होती. मात्र तेथील पाण्याचे पूजन करतानाच घरात पाणी शिरल्याने शहरातील अनेक वस्त्यांचे काय हाल झालेत, याकडेही महानगरपालिकेने पहावे, अशा प्रतिक्रियाही माध्यमांतून उमटल्या.

Leave a Comment