विशेष प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
मुंबईला दसरा मेळावा पार पडला पण शिमगा पाटण तालुक्यात सुरू आहे. पारंपारिक पाटणकर आणि देसाई गट पुन्हा एकदा आमनेसामने आरोप- प्रत्यारोप करून लागले आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांच्या बंडोखोरीमुळे पाटणकर गट चार्ज झाला आहे. आता सुट्टी नाय अशी आरोळी दोन्ही गटाकडून टाकली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पारंपारिक प्रतिस्पर्धी गटात टशन सुरू झाली आहे. मुंबईत दसऱ्याला मेळावा होतो, मात्र पाटणला शिमगा कायमचाच असतो, फक्त तो कमी- जास्त प्रमाणात असतो. त्याचा आवाज सध्य परिस्थितीत डाॅल्बी, डीजेपेक्षा जास्तच वाढलेला आहे.
पाटण तालुका म्हटले की पक्ष, संघटना यापेक्षा गटा- तटात राजकारण रंगते. मंत्री शंभूराज देसाई यांचा शिवसेना पक्ष आणि सत्यजित पाटणकर यांच्या गटाचा राष्ट्रवादी पक्ष असा चिन्हाचा सामना असतो. परंतु देसाई- पाटणकर या गटाचाच सामना ठरलेला असतो. केवळ परिस्थिती कशी आहे, यावर निकाल ठरत असल्याचे दिसून आले आहे. अशातच दोन महिन्यापूर्वी शिवसेना पक्षात बंडखोरी झाली अन् पाटणला पाटणकर गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कारण शिवसेनेत फूट म्हणजे पाटण विधानसभा मतदार संघात देसाई गटाला फटका हे गृहीत धरण्यात आले.
बंडखोरीत मंत्री शंभूराज देसाई यांचा सहभाग असल्याने सत्यजित पाटणकर यांनी गणपतीच्या मुहूर्तावर अनेक कार्यकर्त्याच्या भेटीगाठी सुरू केल्या. अनेक विकास कामांचा मुहूर्तही साधला. अशावेळी कार्यक्रमात मुख्य टार्गेट हे शंभूराज देसाई यांची बंडखोरी पाटणकरांनी ठेवली. एवढेच नाही, पाटणकर गटाचे शांत असलेले कार्यकर्ते अचानक चार्ज झाले. सोशल मिडियावर मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीकास्त्र करण्यात येत आहे. राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या मतदार संघात पाटण मतदार संघाचीही चर्चा सुरू आहे. शंभूराज देसाई यांच्यावर टीका करण्याची एकही संधी गेल्या दोन महिन्यात सत्यजित पाटणकर व त्याच्या कार्यकर्त्यांनी सोडली नाही. एवढेच नव्हे गेल्या कित्याक दिवसांनी विक्रमसिंह पाटणकर यांनी म्हावशी येथे कार्यक्रमास हजेरी लावली अन् तेथेही शंभूराज देसाई यांनाच टार्गेट करण्यात आले.
अशा या काळात देसाई गटाचे कार्यकर्ते आजही पाटणकर यांना आव्हान देत आहेत. एवढेच नव्हे तर खुले मैदानात येण्याचेही आव्हान देत आहेत. दोन्ही गटाकडून या परिस्थितीत आपल्याच विजयाचा दावा केला जात आहे. आ. शंभूराज देसाई यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने आदित्य ठाकरेंच्या सभेत गर्दी केल्याचाही आरोप व व्हिडिअो व्हायरल केले गेले. त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबईत असतानाही राष्ट्रवादीवर टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यानंतर गेल्या आठवड्यात सातारा व कराड येथील पत्रकार परिषदेत आ. देसाई यांनी सत्यजित पाटणकरांना खुले आव्हान दिले आहे. सध्या पाटण विधानसभा मतदार संघात गावागावात देसाई- पाटणकर गट एकमेकांना आव्हान देताना दिसत आहेत. त्यामुळे दसरा संपला असला अन् दसऱ्याचा मेळावा मुंबईत झाला असला तरी शिमगा मात्र, पाटण तालुक्यात सुरूच आहे.
पालकमंत्री पदामुळे देसाई तर बंडखोरीमुळे पाटणकर गटाच दावा
मंत्री शंभूराज देसाई यांना पालकमंत्री पद मिळाल्याने आता विकासकामे केवळ आमचाच गट करणार असून आता सुट्टी नाय असे कार्यकर्ते म्हणतायत. तर दुसरीकडे तुम्हांला काहीही मिळू दे परंतु बंडखोरीमुळे, गद्दारीमुळे देसाई गटाचा पराभव होणारच असा आत्मविश्वास आता पाटणकर गटाकडून दावा केला जात आहे.