टीम हॅलो महाराष्ट्र : अभिनेत्री भूमी पेडणेकरने मुलींच्या लैंगिक आरोग्याविषयी बोलताना बिंधास्त विचार मांडले आणि समाजाच्या लैंगिक मानसिकतेवर भाष्य केले. कंडोम हा शब्द बोलायलाही मुलींना लाज वाटते, कंडोम मागणे हा मुलींचा अधिकार आहे, मेडिकलमध्ये जाऊन कंडोम द्या, असं म्हणण्याचं धाडस महिला किंवा तरुणी करत नाहीत. अजूनही कंडोम म्हणायलाही तरुणी घाबरतात, असं अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली. वायकॉम 18 च्या चॅनेल एमटीव्हीने ‘एमटीव्ही निषेध’ हा कार्यक्रम सुरू केला आहे, या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत भूमी पेडणेकर बोलत होती. या चॅनेलची अँबिसिडर भूमी पेडणेकर आहे.
भूमीने महिलांच्या लैंगिक आरोग्यावर भाष्य करताना म्हंटले की, मला हे जाणून आश्चर्य वाटले की दरवर्षी दहा लाखाहून अधिक गर्भपात महिलांच्या अज्ञानामुळे होतात, कारण तिला कंडोम मागता येत नाही, कंडोम हा शब्द बोलायला लाज वाटते. हे लक्षात घेता, मला असे वाटते की समाजात आपल्याला स्वतःसाठी आणि आपल्या पिढीसाठी एक सुरक्षित वातावरण तयार करणे आवश्यक आहे जेणेकरून आपण मुक्तपणे बोलू शकू. ‘
भूमी पुढे म्हणाली की, स्वातंत्र्य आणि स्वच्छतेची आवश्यकता जितकी पुरुषांची गरज आहे, तितकीच महिलांसाठीही स्वातंत्र्य आणि स्वच्छता गरजेची आहे. आपल्या देशात मुलींना, महिलांना समजून घेतले जात नाही. त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले जात नाही. मुलींना स्वतःच्या समस्या स्वतःच समजून घेऊन समाजासमोर आणायला हव्यात.