सांगली प्रतिनिधी । महापालिकेचे कामकाज गतीने व्हावे व कर्मचार्यांना शिस्त लागावी म्हणून आयुक्त नितीन कापडणीस यांनी कर्मचार्यांच्या हजेरीसाठी बुधवारपासून फेसरिडिंग प्रणाली सुरू केली आहे. तसेच मध्यंतरीच्या वेळेत हालचाल रजिस्टरद्वारे सुद्धा कर्मचार्यांवर वॉच ठेवला जाणार आहे. यामुळे लेटलतिफ व हजेरी लावून दांड्या मारणार्या कर्मचार्यांना आता आळा बसणार आहे. महापालिका कर्मचारी वेळेवर कामावर हजर नसतात, नागरिक हेलपाटे मारून जातात, अशा अनेक तक्रारी नागरिक व नगरसेवकांनी केल्या होत्या.
अनेक अधिकारी व कर्मचार्यांच्याबाबतीत ही तक्रार होती. त्यामुळे आशा कर्मचार्यांना वेळेत कामावर येण्याची सवय लागावी आणि कामकाजात गतिमानता यावी यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी सर्वच कामगारांची फेस रिडींग द्वारे हजेरी घेण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले आहेत. त्यानुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागातील कर्मचार्यांचे फेसरिडींग नोंदणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये एकूण कर्मचारी 2 हजार 737 आहेत. यातील 1 हजार 468 कायम कर्मचारी, 420 मानधन कर्मचारी, 499 स्वच्छता कर्मचारी तर बदली व संपकालीन 340 कर्मचारी आहेत. त्यांची हजेरी आता फेसरीडिंगद्वारे सुरू केली आहे. यामुळे
महापालिकेत काम करणार्या प्रत्येकास दररोज सकाळी 9:45 वाजता आपली फेसरीडिंग द्वारे हजेरी द्यावी लागणार आहे तर सायंकाळी 6:15 वाजता बाहेर पडण्याची हजेरी द्यावी लागणार आहे. तसेच मध्यंतरीच्या वेळेत हालचाल रजिस्टरद्वारे सुद्धा कर्मचार्यांवर वॉच ठेवला जाणार आहे. बुधवारपासून प्रत्यक्ष फेसरीडिंगवर हजेरी सुरू झाली आहे. यामुळे आता कर्मचारी वेळेत कामावर येण्यास मदत होणार आहे शिवाय शिस्तही लागणार आहे.