राज्यात विविध ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड, अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी देखील आल्या आहेत. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी ३ हजार २३७ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, मतदान सुरु झालं असलं, तरी सुरुवातीपासूनच ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी सुरु आहेत. ईव्हीएममध्ये अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड झाले. त्यामुळे काही ठिकाणी उशिरा मतदान सुरु झालं, तर काही ठिकाणी ईव्हीएम बिघाडामुळे मतदानाला व्यत्यय आला.

दरम्यान गंगापूर तालुक्यातील घोडेगाव इथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया गेल्या एक तासापासून ठप्प असल्याची माहिती आहे. तसेच हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावामध्ये सुद्धा ईव्हीएम ला अडचण आली आहे. रुकडी गावातील बूथ क्रमांक २१९ मध्ये ‘व्हीव्हीपॅट’ मशीन बंद असल्यामुळे तासाभरापासून मतदान बंद असल्याची माहिती समोर आली आहे. मशीन बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाल्याचे देखील पहायला मिळत आहे. तर वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात मोहगाव येथील मतदान केंद्रावर १ तासापासून ईव्हीएम मशिन बंद असल्याचे समोर आले आहे.

मोहगाव येथील बुथ क्रमांक ५० वरील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मतदारांची मतदान केंद्राबाहेर रांग लागलेली पहायला मिळत आहे. यानंतर तातडीने मतदान मशीन बदलण्यासाठी चमू रवाना झाला आहे. तसेच हिंगणघाट मतदारसंघात मॉक पोलच्या वेळी सहा मशीनच्या व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाला. त्यानंतर सहाही मशीन बदलण्यात आल्या. तर चाळीसगावात सुद्धा ईव्हीएम बंद झाल्याचे समोर आले आहे. सकाळपासून ईव्हीएम बंदची दुसरी घटना घडली असून मतदान केंद्र क्र ३१० वलठान येथे हि घटना घडली आहे.

Leave a Comment