नांदेडात खळबळ ! मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात साईसदन हे अशोक चव्हाण यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाला सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो. असे असतानाही ही दगडफेकीची घटना घडली आहे. एका अज्ञात महिलेने ही दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. एकंदरीतच या घटनेमुळे नांदेडात खळबळ उडाली आहे.

दगडफेकीच्या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दगडफेक करणारी महिला नेमकी कोण होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ती मनोरुग्ण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दगडफेकीची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे एक पथक अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी दाखल झाले. पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळेही घटनास्थळी दाखल झाले, परंतु तोपर्यंत ही महिला पसार झाली होती.

या घटनेनंतर शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्या महिलेचा शोध घेण्यात येत आहे. या महिलेने अशोक चव्हाण यांच्या घराच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरूवात केली, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने फेकलेला दगड घराच्या दर्शनी भागात असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या केबिनवरील काचावर लागला. त्यामुळे केबिनची काच फुटली. पोलिस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या महिलेचा शोध घेत आहेत.

Leave a Comment