सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
दोन दिवसांपूर्वी सातारा पोलीस दलातील 300 हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. या बदलीत सातारा पोलिस दलातील वाहतूक शाखेचे चालक विजय माळी यांची म्हसवड पोलीस ठाण्यात बदली केल्याने त्यांनी सोशल मीडियावर आत्महत्या करून मी माझे जीवन संपवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. या व्हिडिओमुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती.
सातारा पोलिस दलात झालेल्या या बदल्या चुकीच्या पद्धतीने केल्या गेल्या असल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे. यातच वाहतूक शाखेचे चालक विजय माळी यांनी ही बदली अन्यायकारक असल्याचे म्हटले होते. याबाबत पोलीस प्रमुखांना घरगुती वैद्यकीय कारण सांगत म्हसवड पोलीस ठाण्यास जाण्यास माळी यांनी नकार दिला होता. मात्र पोलीस प्रमुखांना विनंती करून देखील बदली केली गेल्याने माळी नैराश्य होत त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/512921603270015
दरम्यान पोलीस विजय माळी घरातून बेपत्ता झाल्याने पोलिसांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. अखेर आज चालक विजय माळी यवतेश्वर येथे एका बेशुद्ध अवस्थेत आढळून आले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.