शिक्षण विभागात खळबळ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी मध्ये अपहार करणाऱ्या शिक्षकाला पोलिस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वडूज | खटाव तालुक्यातील वडूजच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी जमा केलेली शाळेची फी शिक्षकाने स्वतःच हडप केलेली असून या घटनेने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. या हायस्कूलमधील एका शिक्षकावर अपहाराचा गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी दिली आहे. या प्रकरणात न्यायालयाने संशयित शिक्षकाला 17 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  आनंदा विठोबा जगदाळे (वय 42, रा. पेडगाव, ता. खटाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. आनंदा जगदाळे हा शाळेतील इयत्ता दहावीच्या वर्गावर वर्गशिक्षक होता. त्याच्याकडे विद्यार्थ्यांनी जमा केलेली शालेय फी 61 हजार रुपये होती. दरम्यान त्याच काळात त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार संबंधित गुन्हा वडूज पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर त्याला संस्थेने निलंबित केले होते.

दरम्यानच्या काळात त्याच्या जवळ जमा असलेली गुणवत्ता विकास व शालेय परीक्षा फी शाळेत जमा करण्यासाठी संस्थेने त्याच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला. परंतु त्याने त्याला प्रतिसाद न देता संबंधित रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित जगदाळे याला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दि. 17 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास शांतिलाल अबसे करत आहेत.

Leave a Comment