सातारा | खटाव तालुक्यातील औंध येथे सोमवारी दुपारी लाचलुचपत विभागाने सापळा लावून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना औंध पोलीस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल व पोलिस उपनिरीक्षक यांचा पती यांच्यावर कारवाई करत दोघांना अटक केली. खटाव तालुक्यातील ही तीन दिवसातील दुसरी घटना असून या कारवाईने पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे
याबाबत लाचलुचपत विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे भावाविरुद्ध औंध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत दादासो शिंदे (वय- 34) व सुशांत सुरेश वरुडे (वय- 35) या दोघांनी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली होती. यामध्ये तडजोडी अंती सुशांत सुरेश वरुडे (वय- 35) यांना औंध येथील घाटमाथ्यानजीक 50 हजार रुपयांची लाच संबंधित तक्रारदरकडून घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संबंधित आरोपीच्या आपण पकडला गेलो आहे, हे लक्षात येताच त्याने तेथून धूम ठोकली.
परंतु औंधजवळ थरारक पाठलाग करून संबंधित पथकाने स्वीकारलेल्या रकमेसह वरुडे यास ताब्यात घेतले असता त्याने पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत दादासो शिंदे याच्या सांगण्यावरून घेतली असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक अविनाश जगताप यांनी शहानिशा करून चंद्रकांत शिंदे व सुशांत वरुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सुशांत वरुडे औंध पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे यांचे पती असल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला अविनाश जगताप, उपनिरीक्षक आनंदराव सपकाळ, काटवटे हवालदार संजय साळुंखे पोलिस नाईक संजय अडसूळ, विनोद राजे, प्रशांत ताटे, विशाल खरात, मारुती अडागळे संभाजी काटकर, निलेश येवले, तुषार भोसले, निलेश वायदंडे, शितल सपकाळ यांनी ही कारवाई मध्ये सहभाग घेतला..