कराड | चैतन्या भंडलकर या मुलीचा गळा चिरुन खून करण्यात आला होता. तिचा खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करुन पोक्सो, भादवि ३७६ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांनी केली. तसेच याप्रकरणी न्याय न मिळाल्यास रामोशी समाजाचा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांच्यासह उपस्थित समाजबांधवांनी सदर मागणीचे निवेदन नायब तहसीलदार राजेंद्र तांबे यांना दिले. येथील दत्त चौकातील छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून गृरुवारी या मोर्चास प्रारंभ झाला. सदर मोर्चात उमाजीराजे नाईक यांचे वंशज रमणअण्णा खोमणे, बहिर्जी नाईक यांचे वंशज आबासाहेब जाधव, जय मल्हार संघटनेचे कार्याध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख बाळनाना जाधव, शारदा खोमणे, सुजाता जाधव, कोमल चव्हाण, राज्य कार्यकारिणी सदस्य अशोकराव मदने, आनंदराव जाधव, पं. स. सदस्य चंद्रकांत मदने, जिल्हाध्यक्ष दादासो मंडले यांच्यासह संघटनेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ‘चैतन्याला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा मोर्चात देण्यात आल्या.
याप्रसंगी, दौलनाना शितोळे म्हणाले, चाफळ येथील घटनेत चैतन्या भंडलकर हिची नराधमाने क्रुरपणे हत्या केली. तिचे आई-वडील घराबाहेर गेल्यानंतर संधी साधून त्याने अमानुष व माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने कायद्याची कडक अंमलबजावणी करुन नराधमाला फाशीपर्यंत पोहोचविण्याचे सोपस्कार पार पाडावेत. तसेच याप्रकरणी चैतन्याला न्याय न मिळाल्यास रामोशी समाजाचा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी प्रशासनास दिला आहे.