औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी काल जाहीर केला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शुल्क वाढीवरही फेरविचार करून निर्णय घेऊ असेही कुलगुरूंनी स्पष्ट केले.
अधीसभेच्या बैठकीत सदस्य ॲड. संजय काळबांडे यांनी अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची तीव्रता सभागृहात मांडून शुल्क माफी देणे गरजेचे असल्याची मागणी करत ठराव मांडला. त्याला सर्व सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दर्शवला. यावर बोलताना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, हे विद्यापीठ शेतकरी, कष्टकऱ्यांचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्कासह परीक्षा शुल्कात यावर्षी माफी देण्यात येईल.
यावेळी परकीय भाषा विषयाचे शुल्क रद्द करण्याची मागणी सुनील मगर यांनी केली. त्यावर फेरविचार करून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेऊ असे डॉ. येवले यांनी स्पष्ट केले. एकंदरीतच विद्यापीठाच्या या निर्णयामुळे अतिवृष्टीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात मात्र दिलासा मिळाला आहे.