महाराष्ट्रातील 48 जागांवर Exit Poll काय सांगतायत? साधं सोपं विश्लेषण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा संपला.. त्यामुळं सगळ्या देशाचं लक्ष आता 4 जूनकडे लागलय, पण दोन महत्वाच्या पक्षांमध्ये पडलेल्या फुटी आणि राजकारणाची झालेली भेसळ यामुळे महाराष्ट्र हे प्रेडिक्ट करण्यासाठी सगळ्यात कठीण राज्य होतं.. महायुती की महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या या राजकीय बदलांचा नेमका काय परिणाम झाला हे 4 जूनला स्पष्ट होणार आहेच. पण त्याआधीच निकालाआधीचा महानिकाल समोर आलाय. देशभरातील सर्व एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकणार, याचा अंदाज समोर आलाय… महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व 48 जागांवर वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या आहेत. हे आपण अगदी साध्या सोप्या आणि सविस्तरपणे समजून घेणार आहोत…

पहिला आहे तो एबीपी सी वोटरचा एक्झिट पोल…

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा तर महायुतीला 22 ते 26 जागा मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात आलीये. म्हणजेच मविआ आणि महायुतीला महाराष्ट्रात 50-50 चांसेस असल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसतंय. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाला 9 जागा, काँग्रेसला 8 जागा तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महायुतीत भाजपला 17 जागा, शिंदे गटाला 6 जागा तर अजित पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. थोडक्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारेल असं जे चित्र रंगवलं जात होतं तसं मात्र न होता भाजप आणि शिंदे गट त्यातल्या काही जागा गेन करताना दिसतोय. पण सर्वात विशेष म्हणजे तुतारीच्या दहापैकी 6 जागांवर विजय होत असल्याचा एबीपी सी व्होटरचा दावा असल्याने शरद पवारांसाठी ही लोकसभा निवडणूक फायद्याचीच म्हणावी लागेल…

यासोबत टॉप ऍनॅलिटीकाच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला 26 ते 29 आणि महायुतीला 22 ते 24 जागा मिळतील असा निकाल देत दोघांच्यात क्लोज फाईट असल्याचं त्यांनी दाखवलंय. विशेष म्हणजे पार्टी वाईज बघायचं झालं तर बीजेपी ला 13 ते 17, शिवसेनेला अवघ्या 2 ते 3, अजित पवार गटाला शून्य ते एक तर दुसरीकडे काँग्रेसला 9 ते 11 शिवसेना ठाकरे गटाला 15 ते 17 आणि शरद पवार गटाला 6 ते 7 जागा मिळतील असा निकाल एक्झिट पोल मधून देण्यात आलाय. तर अपक्षाच्या खात्यात 1 जागा देण्यात आलीय. शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला महाराष्ट्रात मोठा फटका बसत असल्याचं या एक्झिट पोलमधुन समोर येतंय…

दुसरा एक्झिट पोल आहे तो न्यूज 18 चा…

न्युज 18 चा हा पोल पाहिला तर महायुतीला 25 ते 32 जागा आणि महाविकास आघाडीला 15 ते 18 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. थोडक्यात महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने निकाल झुकतोय असं या पोलचं म्हणणं आहे. भाजप 23, शिवसेना शिंदे गटाला 7 तर अजित पवार गटाला 2 जागा असं विभाजन करण्यात आलंय. तर ठाकरे गटाला 7, काँग्रेसला 5, शरद पवार गटाला 4 जागा एक्झिट पोलमध्ये देण्यात आल्यात. थोडक्यात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाला समसमान तर शरद पवार गटाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळतील.

तिसरा एक्झिट पोल आहे रुद्र रिसर्च ॲनालिटिक्स रिसर्च या संस्थेचा…

महाविकास आघाडीला तब्बल 34 च्या आसपास तर महायुतीला केवळ 13 जागा मिळतील असा अंदाज रुद्र संस्थेनं देत महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार विरोधात वातावरण असल्याचं दाखवून दिलय. त्यातही पार्टी वाईज जागा पाहिल्या तर भाजपला 9, शिंदेंच्या शिवसेनेला 3 तर अजित पवार गटाला अवघी 1 जागा मिळेल. तर ठाकरेंच्या शिवसेनेला 14, काँग्रेसला 12 तर शरद पवार गट तब्बल 8 जागांवर विजयी होईल, असाही अंदाज सांगतोय. काही महत्त्वाच्या लढतींबद्दल बोलायचं झालं तर बारामतीतून सुप्रिया सुळे ह्या मोठे लीडने तर पुण्यातून रवींद्र धंगेकर आणि नगर मधून निलेश लंके दहा ते बारा हजारच्या निसटत्या लिडने जिंकत असल्याचंही दाखवण्यात आलंय.

आता बोलुयात टिव्ही 9 पोलस्ट्रेटच्या एक्झिट पोल बद्दल…

पोलस्ट्रेटच्या पोलमध्ये महायुतीला 22 तर महाविकास आघाडीला 25 जागांचा कौल देण्यात आला आहे. तर अपक्ष म्हणून 1 खासदार निवडून येईल, असा थोडा वेगळा अंदाज वर्तवण्यात आलाय. यात भाजपला तब्बल 18, शिंदे गटाला 4 तर अजितदादा गटाला शून्य जागा देण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेसला 5, ठाकरे गटाला 14 तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 6 जागांवर यश येईल असं सांगण्यात आलय.

टुडेज चाणक्यचा एक्झिट पोल मात्र महाविकास आघाडीची झोप उडवणार आहे. या संस्थेनं महायुतीच्या खात्यात 33 तर महाविकास आघाडीला अवघ्या 15 जागा मिळतील असा अंदाज बांधलाय… एक्झिट पोलच्या स्पर्धेतील महाराष्ट्रातील आणखीन एक नाव म्हणजे द स्ट्रेलेमाचं…या संस्थेनही महायुतीला 24 ते 27 जागा, महाविकास आघाडीला 20 ते 23 जागा तर अपक्षां9 ते 11,च्या वाट्याला 1 जागा येईल, सांगितलंय. व्होट शेअर बद्दल बोलायचं झालं तर महायुतीला 46% तर महाविकास आघाडीला 45% मत मिळतील असा अंदाज आहे. म्हणजेच मतदान घासून झालं असलं तरी द स्ट्रेलेमाच्या एक्झिट पोलनुसार महायुतीचं पारड जड दाखवण्यात आलय.

आता पाहूयात दैनिक भास्करच्या रिपोर्टर्स एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात नेमकं कोण आघाडीवर आहे ते? दैनिक भास्करच्या पोलनुसार महायुतीला 28 ते 30 जागा तर महाविकास आघाडीला 16 ते 20 जागांचा कौल देण्यात आलाय. पार्टी वाईज याची विभागणी केली तर भाजपला तब्बल 20 ते 23 जागा, शिवसेना शिंदे गटाला 6 ते 7 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन ते तीन जागा मिळतील. दुसरीकडे काँग्रेसला केवळ 1 ते 2 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 10 ते 12 जागा आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 5 ते 6 जागा मिळतील असा अंदाज सांगितलाय. थोडक्यात दैनिक भास्करने काँग्रेसला 1 ते 2 जागांवर गुंडाळल्याने हा आघाडीसाठी मोठा लॉस ठरू शकतो…

श्री मीडियाच्या एक्झिट पोलनुसार सुद्धा महायुती तब्बल 31 तर महाविकास आघाडी केवळ 16 जागांवर जिंकेल असा दावा करण्यात आलाय. यातही भाजप 20, शिंदे गट 8 तर अजित पवार गटाला 3 जागांचा कौल देण्यात आलाय. तर दुसरीकडे काँग्रेसला 6, ठाकरे गटाला 8 तर शरद पवार गटाला फक्त 2 जागांवर गुंडाळण्यात आलय…थोडक्यात पोल ऑफ पोल काढायचा झाला तर 8 पैकी 5 कौल हे महायुतीच्या बाजूने झुकतायत… प्रत्येक पक्षाच्या जागांचा आकडाही पोलनुसार बदलताना दिसतोय. त्यामुळे महाराष्ट्राची हवा नेमकी कुठे आहे यावर अचूक भाष्य करण एक्झिट पोलनाही जमत नाहीये असं म्हणायला हरकत नाही. बाकी यातल्या नेमका कुठला पोल तुम्हाला 4 तारखेच्या निकालाच्या जवळ जाणारा वाटतोय? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.