हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून एक्झिट पोल (Exit polls) आणि ओपिनियन पोल (Opinion Polls) संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामध्ये येत्या 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत बंदी राहील असे निवडणूक आयोगाने (Election Commission) सांगितले आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये एक्झिट पोलच्या निकालांचे प्रकाशन आणि प्रसारण करण्यास माध्यमांवर बंदी असेल. आयोगाच्या या आदेशानुसार, एक्झिट पोल हे 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते आणि 19 जून रोजी संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत बंद राहतील.
याबाबतची माहिती देत राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी सांगितले आहे की, 19 एप्रिल ते 1 जूनपर्यंत एक्झिट पोलच्या प्रसारण आणि प्रकाशनावर बंदी असणार आहे. यासह एक्झिट पोल घेण्यावर आणि याचे निकाल वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित करण्यावर बंदी असेल. या एक्झिट पोलचे निकाल इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे किंवा कोणत्याही प्रकारे प्रकाशित करता कामा नये. मतदान प्रक्रिया संपेपर्यंत 48 तासांच्या कालावधीत एक्झिट पोलचे आणि ओपिनियन पोलचे अंदाज किंवा निकाल प्रकाशित करण्यावर बंदी राहील.
याचबरोबर, या आदेशांचे उल्लंघन केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड ठरवण्यात येईल. कोणत्याही मीडिया संस्थांना निवडणुकीच्या काळात मतदान आणि सर्वेक्षणाचे अंदाज प्रकाशित किंवा प्रसारित करता येणार नाहीत. पुढे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनीही सांगितले आहे की, “निवडणुकीच्या कालावधीत कोणतीही व्यक्ती राज्यात कोणतेही ओपिनियन पोल घेणार नाही तसेच कोणत्याही ओपिनियन पोलचे निकालाचे अंदाज प्रकाशित किंवा प्रसारित करू शकणार नाही. हे निर्बंध मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत कायम राहतील”
दरम्यान, राज्यामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा सर्वाधिक लक्ष केंद्रित करत आहे. तसेच, दररोज कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. अशातच आता निवडणूक आयोगाने एक्झिट पोलवर बंदी घातली आहे.