हल्लीचं कॉलेज जीवन इतकं रोमँटिक झालंय, की तिथूनच आयुष्याचा जोडीदार मिळतो की काय? अशी धास्ती बऱ्याच कुटुंबियांना लागून राहिलेली असते. लग्नाळू मुला-मुलींनाही मनापासून काही गोष्टी या अशाच असाव्यात असं वाटत. अशातच विचार करण्याचं स्वातंत्र्य असलेली मुलगी, तिच्या खऱ्या राजकुमाराकडून काय अपेक्षा ठेवते हे वाचणं मजेशीरच ठरेल..
त्यानं मला हवं तसंच नसावं,
पण तो जसा आहे तसाच मला हवाहवासा वाटावा…!!
फक्त त्यानंच माझ्यासाठी स्वतःमध्ये बदल करावेत असंही नकोय मला,
मी सुद्धा कुणासाठी तरी स्वतःमध्ये बदल करावेत असा हवा…!!!
शंभर टक्के परफेक्ट तर कुणीच नसतं , तोही नसावा….!!!
त्यालाही असाव्यात काही वाईट सवयी…मलाही आहेत. पण हे जाणून घ्यावं आम्ही दोघांनीही पूर्णपणे.
तो स्वार्थी नसावा…
माणसं जोडून ठेवणारा असावा…
माणसांची, त्यांनी केलेल्या मदतीची आयुष्यभर जाण ठेवणारा…
माणसांत रमणारा असावा…!!
फक्त माझ्यात नव्हे तर इतरही माणसांत , गोष्टींत, घटनांमध्ये तो वेगळेपण शोधणारा असावा….!!!
त्याच्या कामाचा, कर्तृत्वाचा त्याला गर्व नसावा….पण मला अभिमान वाटावा….!!!
लोक त्याच्या विचारांबद्दल, कामाबद्दल त्याचं कौतुक करतील असा हवा….!!!
सर्व वयोगटातल्या लोकांशी सहजपणे संवाद साधू शकणारा, सतत हसतमुख असणारा, स्वतःच्या विचारांवर, मतांवर ठाम असणारा, पण तितकाच दुसऱ्याच्या मतांचा आदर करणारा, स्वतःच्या कामावर प्रेम करणारा, त्यात आनंद शोधणारा, छोट्या छोट्या गोष्टींमुळे खुश होणारा, थोडासा इमोशनल, हळवा असा आणि हो मला सहन करू शकणारा असावा….!!!
फार नाहीत अपेक्षा….!
इतकंच…!!
विभावरी नकाते, इचलकरंजी