औरंगाबाद| बनावट विदेशी दारू बनवून विक्री करणाऱ्यांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पर्दाफाश करण्यात आला आहे. तसेच जालना जिल्ह्यातील बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई देखील करण्यात आली. यासोबतच शनिवारी चारचाकी वाहनातून हिच बनावट दारु विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल सात लाख रुपयांचा बनावट दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना रविवारी न्यालयालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी कि, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एक संशयित चरचाकीची तपासणी केली असता, त्यात सहा लाख ८४ हजार ५४० रुपये किंमतीची बनावट विदेशी दारू आढळून आली, यासह प्रदीप सर्जेराव जायभाये (रा. क्रांतीनगर, गणेश चौक, मखमनाबाद रोड पंचवटी नाशिक, हल्ली मुक्काम डोणगाव, ता.अंबड, जि.जालना) व नामदेव एकनाथ घुगे (रा. टाका, ता.अंबड, जि. जालना) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दोन्ही आरोपींची चौकशी केली असता, त्यांच्या घरी तपासणी करण्यात आली. यात बनावट दारू बनवणारे स्पिरिट, दारूच्या बॉटलला लावण्याकरिता लागणारे झाकणे, दारूमध्ये मिळवण्यासाठी लागणारे अर्क, विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटल्स असा एकूण १८ हजार १८० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. यामुळे एकूण कारवाईत ७ लाख २ हजार ७३० रुपये किंमतीचे माल जप्त करण्यात आले आहे.
दोन्ही आरोपीला रविवारी (ता.एक) ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही करावाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचाल उषा वर्मा, औरंगाबाद विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक एस.एल.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक व्ही.व्ही. रोकडे, निरीक्षक जावेद कुरेशी, स्टाफ निरीक्षक अरुणकुमार चव्हाण, दुय्यम निरीक्षक जी.बी. इंगळे, जवान युवराज गुंजाळ, भास्कर काकड, रवींद्र मुरुडकर, मोतीलाल बहुरे, शेख निसार, धनंजय डीडुळ, शेरेक कादरी, संजय गायकवाड आदींनी पार पाडली.