बनावट बायोडिझेलच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश; 600 लिटरचा साठा जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती | जिल्ह्य़ातील बडनेराच्या जुनी वस्ती येथील दुकानातून शहर गुन्हे शाखेने तब्बल ६०० लिटर बायोडिझेल जप्त केले. पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई करण्यात आली. तेथून एकाला अटक करण्यात आली आहे. अमरावती शहरात पहिल्यांदाच अवैध व विनापरवाना बायोडिझेलच्या विक्रीचा प्रकार उघड झाला आहे. शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे हे पथकासह गस्त घालत असताना एका ठिकाणी विक्रीसाठी बायोडिझेलचा साठा करून ठेवल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याआधारे कोंडेश्वर रोडवरील महानगरपालिकेच्या मार्केट क्रमांक ७ मधील अमर देशमुख यांच्या दुकानात धाड घालण्यात आली.

तेथे संकेत अशोक वडे २२ वर्षे राहणार काटआमला हा बायोडिझेलची अवैध व विनापरवानगी विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे ६०० लिटर बायोडिझेल जप्त करण्यात आले. याबाबत पुरवठा विभागाशी संपर्क साधण्यात आला. पुढील कारवाई पुरवठा विभाग करणार आहे.

पोलीस आयुक्त डॉ . आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे , एएसआय संजय वानखडे , रंगराव जाधव , जावेद खान , राजू आप्पा , फिरोज खान , निवृत्ती काकड , प्रशांत नेवारे यांनी केली. अवैध व विनापरवानगी बायोडिझेल विक्रीवर झालेली शहर तथा जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईने बायोडिझेलचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Comment