औरंगाबाद | मका खरेदीसाठी शासनाने मुदतवाढ दिलेली असून 31 जुलैपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना माल विक्रीस आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या अंतर्गत रब्बी हंगामातील मका खरेदीसाठी जिल्ह्यातील आठ केंद्रांमध्ये पुन्हा मका खरेदी सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील फुलंब्री, गंगापूर, कन्नड, करमाड, खुलताबाद, गंगापूर, सोयगाव आणि वैजापूर येथील तालुका विविध सहकारी संघाच्या केंद्रावर मका खरेदी सुरू करण्यात आली होती. त्याचबरोबर जिल्ह्यात 36 हजार क्विंटल मका खरेदीचा कोटा देण्यात आला आहे. मका विक्रीसाठी एकूण 2 हजार 495 शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. केंद्रातर्फे शेतकऱ्यांना माल घेऊन येण्यासाठी सांगण्यात आले होते. परंतु 165 शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला.
यामुळे फक्त चार हजार सात क्विंटल मका खरेदी होऊ शकला. आता शेतकऱ्यांकडून पुन्हा केंद्र सुरु करण्याची मागणी झाल्यामुळे शासनाकडून केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मका खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस. के. पांडव यांनी केले आहे.