औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ‘पेट’ साठी दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. पेटमध्ये पात्र तसेच पेट मधून सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यास 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने पीएचडी एंन्ट्रन्स टेस्ट् (पेट पेपर पहिला व दुसरा) जानेवारी व मार्च महिन्यात 45 विषयात पेट घेण्यात आली. पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेचे 4 हजार 299 पात्र ठरले आहेत. पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र (सेट-नेट एम. फिल आदि )विद्यार्थ्यांची नोंदणी 7 ते 30 जून दरम्यान ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. मात्र कुलगुरू डॉ .प्रमोद येवले यांनी 15 जुलैपर्यंत मुदत वाढ दिली आहे. 20 जुलैपर्यंत विद्यापीठात हार्ड कॉपी जमा करता येईल. या टप्प्यात पेठ उत्तीर्ण झालेले तसेच पेठ मधून सूट मिळालेले दुसऱ्या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत.
विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात कार्यरत संशोधक, मार्गदर्शकांना सेवानिवृत्तीपर्यंत संशोधक विद्यार्थी यांना मार्गदर्शन करता येणार आहे. जे संशोधन मार्गदर्शक वयाचे 57 वर्षे पूर्ण करीत होते त्यांच्या नावासमोर एक मंजूर जागा 0 करण्यात आली होती. त्यात आता बदल करण्यात आला असून जे संशोधन मार्गदर्शक 15 जुलै रोजी आप आपल्या आस्थापनेवर कार्यरत आहेत. त्यांच्या नावासमोर त्यांच्या पदनिहाय मंजूर संख्या दर्शवण्यात येतील. त्यांना नवीन संशोधक संशोधनासाठी देण्यात येईल असे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले आहे.