देवेंद्र फडणवीस सरकारने ९६ टक्के आश्वासने पूर्ण केली; ‘भाजपा’च्या लोकनीती केंद्राचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी चार दिवस उरले असताना भाजपशी निगडित लोकनीती संशोधन केंद्राने अहवाल प्रसिद्ध करून २०१४ च्या जाहीरनाम्यातील ९६ टक्के आश्वासने पूर्ण केल्याचा दावा केला. जातसमूह आणि त्यांच्या अस्मितेचा प्रश्न सोडवतानाच विकासाचे राजकारण फडणवीस सरकारने केल्याचा युक्तिवाद ‘लोकनीती’चे संचालक आणि खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी गुरुवारी ‘वॉक द टॉक’ या अहवाल प्रकाशना वेळी केला.

काही योजना दीर्घकालीन असतात, त्याचा लाभ भविष्यात होतो. जलयुक्त शिवाराचा लाभ आगामी दोन-तीन वर्षांत दिसू लागेल. कृष्णा-कोयना नद्या जोडून मराठवाड्यातील दुष्काळावर मात केली जाईल. मराठवाड्यातील बांध जोडून वॉटरग्रीड तयार केले जाईल, अशा काही योजना गेल्या पाच वर्षांमध्ये कार्यान्वित झाल्या आहेत, असे सहस्रबुद्धे म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेतून १८ हजारहून अधिक गावे पाणीटंचाईतून मुक्त झाल्याचा निष्कर्षही अहवालात काढण्यात आला आहे. उद्यम सुलभतेत भारत १२९ वरून ५६ क्रमांकावर पोहोचला त्यात महाराष्ट्राचा सहभाग मोठा आहे. राज्यात बांधकाम क्षेत्रात परवाना देण्याची पद्धत सुलभ झाली आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन होत असल्याने अल्पकाळात कामांना गती मिळणेही शक्य झाल्याचे सहस्रबुद्धे म्हणाले.

सक्षम लोकशाहीसाठी सशक्त विरोधी पक्ष असलाच पाहिजे. विरोधी पक्ष संपवून भाजपला सत्ता मिळवायची नाही. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपची सत्ता असलेली राज्ये वाढत असली तरी हे यश डोक्यात जाणार नाही याची काळजी पक्ष घेईल, असेही सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

Leave a Comment