टीम हॅलो महाराष्ट्र : गुंडाना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातील गुन्हेगारीविषयी बोलू नये, अशी टीका महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून विरोधी पक्षनेते फडणवीसांना लक्ष्य केले. त्यांनी म्हंटले की,देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादव सारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणा-या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारी बाबत बोलू नये.
फडणवीसांनी राईचा पर्वत करू नये
थोरात म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी भारतरत्न इंदिरा गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.
इंदिरा गांधींनी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्याशी झालेल्या बैठकीबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांनी वक्तव्य केले होते. या संदर्भात संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे तसेच त्यांनी माफी मागितली आहे. त्याचवेळी राऊत यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, कॉंग्रेसने अंडरवर्ल्डला सोबत घेऊन निवडणूक जिंकली का? कॉंग्रेसला अंडरवर्ल्डकडून निधी मिळाला का? अशी गंभीर आरोप फडणवीस यांनी केले होते.