फडणवीस तुमची १०० पापे भरली आहेत : भाई जगतापांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र द्वेष आहेच, कारण अनेक प्रकल्प – कार्यालये महाराष्ट्रबाहेर नेले. आता मोदींनंतर फडणवीस यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे. फडणवीस सत्तेसाठी किती लाचार आहांत, त्यांच्या परवाच्या कर्तृत्ववाने राज्याचे नाव धुळीस मिळवले. रेमदेसीवीर इंजेक्शनचा साठा केलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी फडणवीस जातात ? लॉकडाऊन उठल्यावर फडणवीस, भाजप यांना सळो की पळो करून राहिल्या शिवाय रहाणार नाही. फडणवीस यांची 100 पापे भरली आहेत, अशी घणाघाती टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली.

राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना दुसरीकडे जोरदार राजकारणही पाहायला मिळत आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची रेमडेसिव्हीरबद्दल भूमिका महाराष्ट्र द्वेषी असल्याचा घणाघात जगताप यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील महाराष्ट्र द्वेषी आहेत. त्यांनी फायनास्स सेंटर अहमदाबादला नेलं. फडणवीसही आता गुजरात मॉडेलचं अनुकरण करताना महाराष्ट्र कसा मागे राहील हे पाहत आहेत, असा गंभीर आरोप जगताप यांनी केलाय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ नाही. मात्र, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी त्यांच्याकडे वेळ आहे, अशी टीकाही जगताप यांनी पंतप्रधान मोदींवर केलीय.

फडणवीस हे सत्तेसाठी किती लाचार झाले आहेत. त्यांच्या परवाच्या कृत्यामुळे राज्याचं नाव धुळीस मिळालं. रेमडेसिव्हीरचा साठा केलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी फडणवीस जातात? असा उपरोधिक सवालही भाई जगताप यांनी विचारलाय. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी फडणवीस आणि त्याच्या सहकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणीही जगताप यांनी केलीय. लॉकडाऊन उठल्यानंतर फडणवीस आणि भाजपला सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाही. फडणवीसांची 100 पापे भरली आहेत. रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार, असा इशाराच भाईंनी यावेळी दिलाय.

You might also like