दिसण्यावर जाऊ नका ! भारतीय वायुदलाच्या नावाखाली फसवणूक! पुण्यात भामट्याला रंगेहात पकडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारतीय वायुदलाचा कर्मचारी असल्याचा बनाव करत पुणे शहरात फिरणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई साउथर्न कमांड मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे खराडी पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. खडकी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तीचे नाव गौरव कुमार असे असून, त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम १६८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संशयास्पद हालचालींवरून उघड झाली बनावट अधिकारीगिरी

गौरव कुमार याच्या संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर साउथर्न कमांडची मिलिटरी इंटेलिजन्स टीम आणि खडकी पोलिसांनी संयुक्त तपास सुरु केला. सततच्या देखरेखीअंती, रविवारी रात्री ८:४० वाजता त्याला खराडी परिसरातून अटक करण्यात आली.

वायुदलाची गणवेश, बूट आणि बॅजसह आढळला

गौरवकडे भारतीय वायुदलाचे दोन टी-शर्ट, एक जोडी कॉम्बॅट पँट, शूज, दोन वायुदल बॅज आणि ट्रॅकसूटचा ऊपरी भाग असा साहित्य सापडला आहे. या गोष्टी त्याने स्वतःला वायुदलाचा अधिकारी भासवण्यासाठी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा हेतू काय होता आणि या बनावट ओळखीचा वापर कुठे आणि कशासाठी केला गेला होता, याचा तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान पुणे शहर खराडी पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून या आरोपीकडून फसवणुकीसाठी वापरले गेलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार गौरव कुमार यांना वायुसेनेची बनावट ओळखपत्र तयार करून अनेक महिलांशी संपर्क साधला होता. तो स्वतः वायुसेना अधिकारी असल्याचे सांगत महिलांचा विश्वास जिंकायचा अशी माहिती मिळाली आहे. या फसवणुकीचे बिंग मिलिटरी इंटेलिजन्स ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फुटले गेले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गौरवला ताब्यात घेतले त्याच्याकडे बनावट कागदपत्र आणि वायुसेनेच्या गणवेशाचा वापर करत असल्याचे देखील पुरावे आढळले आहेत

मोठ्या नेटवर्कचा भाग ?

गौरवकडून अधिक माहिती घेतली जात असून, त्याचा एखाद्या मोठ्या टोळीशी संबंध आहे का, किंवा याआधीही अशा प्रकारची फसवणूक केली आहे का, याचा तपास सुरु आहे. मिलिटरी इंटेलिजन्सकडून अतिशय बारकाईने चौकशी केली जात आहे.

नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन

या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, जर कोणतीही व्यक्ती लष्करी गणवेशात किंवा संशयास्पद स्थितीत आढळली, तर तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. पुणे पोलिस व मिलिटरी इंटेलिजन्स सतर्क असून अशा कोणत्याही बनावट कारवायांवर कठोर कारवाई करण्यासाठी सज्ज आहेत. ही घटना केवळ बनावटगिरी नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देणारी आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांबाबत नागरिकांनी जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे.