औरंगाबाद – बनावट नोटा छापणाऱ्या टोळीच्या मुसक्या पुंडलीकनगर पोलीसांनी आवळल्या आहे. उच्च शिक्षित सराईत आरोपी हुबेहुब बनावट नोटा तयार करायचा, मुकुंदवाडीतील रुम किरायाने घेऊन बिनबोभाट हा गोरखधंदा सुरु होता. पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. आरोपींच्या ताब्यातून 500, 100, 50 रुपयांच्या सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य कॉमप्युटर, ऑल ईन वन प्रिंटर, कटर स्केल, कागद असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबर रोजी पोलिसांना काही जण पुंडलीकनगर रोडवरील सुपर वाईन शॉप या दुकाणात बनावट नोटा देवुन दारु खरेदी करत असल्याची माहीती मिळाली. त्यानंतर 28 डिसेंबर रोजी विशेष पथकाचे स.पो.नि. एस. के. खटाने यांना सापळा लावून कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार स.पो.नि. खटाने यांनी त्याच्या पथकासह सापळा लावुन बातमीदाराने दिलेल्या बातमी प्रमाणे रघुनाथ ढवळपुरे यास 28 डिसेंबर रोजी सायंकाळी ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपुस करून माहीती घेतली असता समरान उर्फ लक्की रशीद शेख हा त्याचा साथीदार नितीन चौधरी यांच्या मदतीने मुकुंदवाडी येथे किरायाने रुम घेवून त्याठिकाणी बनावट नोटा तयार करुन त्या नोटा अक्षय अन्नासाहेब पडुळ व दादाराव पोपटराव गावडे यांच्या मार्फत बाजारात चालवण्यासाठी विक्री करत आहे. या आशयाची माहीती मिळाल्यावरुन स.पो.नि. खटाने व त्याच्या पथकाने छापा मारून आरोपी समरान उर्फ लक्की रशीद शेख (30, रा. जसवंतपुरा नेहरु नगर औरंगाबाद), नितीन कल्याणराव चौधरी (25, रा मुकुंवदवाडी), अक्षय आण्णासाहेब पडुळ (28, रा. गजानन नगर), दादाराव पोपटराव गावंडे (42, रा. गजानन नगर), रघुनाथ चैनदास ढवळपुरे (49, रा. गजानन नगर) यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून 500, 100, 50 रुपयांच्या बनावट नोटा सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांच्या जप्त करण्यात आल्या.
बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य कॉमप्युटर, ऑल ईन वन प्रिंटर कटर स्केल, कागद असा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच तयार केलेल्या बनावट नोटा वाहतुक करण्यासाठी वापरलेली गाडी महींद्रा लोगन कार व संपर्कासाठी वापरत असलेले पाच मोबाईल फोन असा एकूण 3,10,390 / – रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलीस अंमलदार गणेश डोईफोड याच्या फिर्यादीवरून पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सर्व आरोपीतांना गुन्ह्यात अटक केली आहे .