हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बदलापूर (Badlapur) येथील आरोपी अक्षय शिंदेचे (Akshay Shinde) एन्काऊंटर प्रकरण हे राज्यभरात चर्चेचा भाग बनले होते. सध्या या प्रकरणाची सुनावणी देखील न्यायालयात सुरू आहे. परंतु अशातच या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. आता आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी संबंधित केस लढण्यास नकार दिला आहे. सध्या उच्च न्यायालयात (High Court) सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान अक्षयच्या आई-वडिलांनी खटला पुढे न चालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
कुटुंबीयांचा माघार घेण्याचा निर्णय
बदलापूरमधील एका शाळेतील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अक्षय शिंदेवर लावण्यात आला होता. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केल्याची बातमी समोर आली. परंतु हा एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप अक्षयच्या कुटुंबियांनी लावला होता. पुढे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून हे एन्काऊंटर खोटं असल्याचा आरोप केला होता आणि दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती.
याच प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू असताना अचानकपणे अक्षय च्या आई-वडिलांनी केस लढण्यास नकार दिला आहे. आम्हाला अधिक तणाव सहन करावा लागतो, लोकांनी आम्हाला खूप त्रास दिला, त्यामुळे हा खटला पुढे चालवायचा नाही, असे अक्षयच्या आई-वडिलांनी उच्च न्यायालयात सांगितले आहे. तसेच, कोणत्याही दबावामुळे आम्ही हा निर्णय घेतला नाही असेही कुटुंबीयांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणात 55 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावरून न्यायालयाने सरकारला आणि पोलिस प्रशासनाला चांगलेच सुनावले आहे. यासह दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का झाली नाही, याचा खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र आता कुटुंबीयांनी हे प्रकरण पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांनी घेतलेला हा निर्णय संशयास्पद मानला जात आहे.




