हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आज सकाळी प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे वयाच्या ७८व्या वर्षी निधन झाले. मागच्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. आज सकाळी त्यांनी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुमित्रा भावे यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सुमित्रा भावे या मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत १४ चित्रपट, ५० हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांची निर्मिती केली. त्यांच्या या कार्याला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन विषयात एम.ए चे शिक्षण पूर्ण केले होते.
या व्यतिरिक्त त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामविकास विषयाची पदविका देखील मिळवली होती. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुमित्रा भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम सुद्धा केले होते. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक विश्वावर शोककळा पसरली आहे.