अमरावती उपविभागीय कार्यालयात शेतकऱ्यांनी घुसविल्या थेट बैलजोड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । शेती वहीवाटीच्या पांदण रस्त्यांचे काम तात्काळ सुरु करा. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी अमरावती उपविभागीय कार्यालयात थेट बैलजोड्या घुसविल्या. यावेळी शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले दिसत होते. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर शेतकऱ्यांनी या बैलजोड्या कार्यालयाबाहेर काढल्या.

यंदा अतिपावसामुळे पांदण रस्त्यांची कामे झाली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले. प्रशासनाकडून पांधणरस्ते विकास योजनाचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला होता, मात्र ते तयार करण्यात प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत. असा आरोप शेतकऱ्यांनी केला. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

अमरावती तालुक्‍यातील १५८ पांदण रस्त्यांचे प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. कृषी उद्योगाची प्रगती होण्यासाठी किमान शेतीचे वहीवाटीचे कच्चे रस्ते करणे गरजेचे आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे? असा सवाल उपस्थित करण्यात आला. अमरावती उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी सुरुवातीला धरणे दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्यासोबतच आणलेल्या बैलजोड्या एसडीओंच्या कक्षात घुसविण्याचा प्रयत्न सुरू केला.

Leave a Comment