.. आणि ‘त्या’ भावुक क्षणानंतर हवा बदलली; रात्रीच ट्रॅक्टर घेऊन शेतकरी दिल्लीच्या सीमेवर परतले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या ६५ दिवसांपासून दिल्ली सीमेवर कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला २६ जानेवारीला काढलेल्या ट्रॅक्टर मार्चला हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांच्या एक हिंसक गट आणि पोलीस अनेक भागांमध्ये आमनेसामने आले. यानंतर शेतकऱ्यांच्या शांतीपूर्ण आंदोलनावर एक लांछन लागलं. शेतकऱ्यांचे मनोबल खचलं होत. बऱ्याच शेतकऱ्यांनी घराची वाट धरली. अशा वेळी या आंदोलनाला गुंडाळण्यासाठी दिल्लीसह उत्तर प्रदेश पोलिसांनी वेगवान हालचाली सुरू केल्या. शेतकरी आंदोलन आता संपुष्टात येणार असं दिसू लागलं. पोलिसांचा मोठा फौजफाटा दिल्लीच्या गाजीपूर सीमेवर गोळा झाला होता. मात्र गेल्या काही तासांत वातावरण संपूर्ण पालटलं आहे.

प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनाची धार काहीशी कमी होताना दिसत होती. ही संधी पाहून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना हटवून सीमा मोकळ्या करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आंदोलन संपणार अशी शक्यता वर्तवली जात होती. गाझीपूर सीमेवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झाला. त्यांनी तंबू, शौचालयं हटवण्याचं काम सुरू केलं.

 

मात्र, भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकेत यांना माध्यमांशी संवाद साधताना अश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांसोबत विश्वासघात झाला आहे. तिन्ही कायदे मागे न घेतल्यास आत्महत्या करेन, असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर टिकेत यांनी उपोषण सुरू केलं. यानंतर पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरयाणात एक भावुक लहर उठली. आणि शेतकऱ्यांनी पुन्हा दिल्ली सीमेची वाट धरली. पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरयाणातील अनेक गावखेड्यांमध्ये रात्रीच पंचायत झाली. यात सर्वानी आंदोलन सुरु ठेवण्याचा ठराव करत दिल्ली सीमेकडे परतण्याचा निर्णय घेतला.

यानंतर रातोरात पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणाच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन गाझीपूर सीमा गाठली.सीमेवरील परिस्थिती बदलताच पोलिसांचा पवित्रादेखील बदलला.पोलिसांनी कारवाईला स्थगिती दिली. याशिवाय खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत केला गेला. गेल्या काही तासांत गाझीपूर सीमेवरील वातावरण पूर्णपणे बदललं आहे. या आंदोलनाला आता संजीवनी मिळाल्याचं दिसत आहे. शेतकरी आता पेटून उठले असून २६ जानेवारीच्या घटनेला विसरत पुन्हा शांतीच्या मार्गाने आंदोलन करण्याचे त्यांनी सांगितले आहे. जो तीन कृषी कायदे सरकार परत घेत नाही तोवर घरवापसी करणार नाही असं शेतकऱ्यांनी पुन्हा जाहीर केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment